शिवना-मादनी येथील नुकसानीची महसूल पथकाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 06:51 PM2019-07-04T18:51:54+5:302019-07-04T18:51:54+5:30
पर्जन्यमापक यंत्र नसल्याने शासनाकडे अतिवृष्टीची नोंद नाही
सिल्लोड (औरंगाबाद ) : शिवना-मादनी परिसरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांना दिले आहेत. नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करून त्याचा अहवाल शासनाला तात्काळ पाठवणार असल्याचे उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी लोकमतला सांगितले.
तालुक्यातील शिवना व मादनी परिसरात मंगळवारी रात्री अतिवृष्टि झाली. त्यात बुलढाणा अजिंठा रस्ता दोन दिवसांपासून बंद होता. या परिसरातील हजारो हेक्टर शेतजमीन, पीके वाहून गेली. नुकसानीची दखल घेवून तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी स्थळ पाहणी अहवाल देण्याच्या सूचना संबंधित तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना दिल्या. आज मादनी शिवारातील 70 व खुपटा शिवारातील 60 असे 130 शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी तलाठी विजय शेळके, कृषी सहायक अजीत वळवी यांनी केली. त्याचा अहवाल तहसीलदारांना देण्यात आला.
पावसाची शासकीय नोंद नाही
शिवना व मादनी परिसरात 65 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, येथे अतिवृष्टि झाली नसल्याचा दावा प्रशासन करीत आहे. शिवाय शिवना व मादनी येथे पर्जन्यमापक यंत्र नाही यामुळे शासनाकडे कुठलीच नोंद नाही.
शिवना, मादनी परिसरात अतिवृष्टि झाल्याची नोंद सरकारी दप्तरांत नाही, यामुळे नुकसानीचे पंचनामे करता येत नाहीत. या परिसरात प्रचंड नुकसान झाले हे बरोबर आहे. तलाठी, मंडल अधिकारी यांना अहवाल देण्यास सांगितले आहे. नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनास देण्यात येईल.
- रामेश्वर गोरे तहसीलदार सिल्लोड.