औरंगाबादच्या ‘शिवनेरी’ पळविल्या पुण्याला; दोनच गाड्या उरल्याने ट्रॅव्हल्सची चंगळ

By संतोष हिरेमठ | Published: July 26, 2022 02:29 PM2022-07-26T14:29:46+5:302022-07-26T14:31:17+5:30

शहरातून पुण्याला दिवसभरात धावतात ७० ट्रॅव्हल्स

'Shivneri' of Aurangabad ran to Pune; As there are only two trains left, travel is tight | औरंगाबादच्या ‘शिवनेरी’ पळविल्या पुण्याला; दोनच गाड्या उरल्याने ट्रॅव्हल्सची चंगळ

औरंगाबादच्या ‘शिवनेरी’ पळविल्या पुण्याला; दोनच गाड्या उरल्याने ट्रॅव्हल्सची चंगळ

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
औरंगाबादहून पुण्याचा प्रवास करायचा तर शिवनेरी बसने, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जात होते. वातानुकूलित शिवनेरी बसचे तिकीट मिळणेही अवघड होत असे, इतका प्रवाशांचा प्रतिसाद असे. मात्र, कोरोनाकाळात औरंगाबादच्या शिवनेरी बस पुणे विभागात पळविण्यात आल्या. त्यामुळे आता औरंगाबाद विभागाकडे केवळ दोनच शिवनेरी बस उरल्या आहेत. एसटी महामंडळाच्या कारभारामुळे ट्रॅव्हल्सची संख्या वाढत असून, औरंगाबादहून पुण्याला दिवसभरात ७० वर ट्रॅव्हल्स धावत आहेत.

कोरोनापूर्वी औरंगाबाद-पुणे मार्गावर औरंगाबाद विभागाच्या ६ शिवनेरी बस धावत होत्या. शिवनेरी बससाठी जिल्ह्यातील ३० चालकांना बंगळुरु येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रवाशांच्या गर्दीमुळे औरंगाबाद-पुणे मार्ग एसटी महामंडळासाठी सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग ठरत असल्याचे सांगितले जात होते. औरंगाबादहून शनिवारी, रविवारी आणि सुट्यांच्या कालावधीत पुण्याला ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आरामदायक आणि वातानुकूलित प्रवासासाठी शिवनेरी बसला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या मोठी असते; परंतु औरंगाबादच्या विभागाच्या सर्व शिवनेरी बस पुणे विभागाला देण्यात आल्या. या बसेस पुण्याहून मुंबई मार्गावर चालविण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या पुणे विभागाच्या ६ बस औरंगाबादला ये-जा करतात. त्याचाच काही प्रमाणात आधार प्रवाशांना मिळत आहे.

या दोन बसही वेरुळ, अजिंठ्याच्या...
जवळपास ७ वर्षांपूर्वी एसटी महामंडळाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचा विशेष निधी दिला होता. या निधीतून अजिंठा आणि वेरुळला जाणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी दोन वातानुकूलित शिवनेरी बस विकत घेण्यात आल्या. या बसवर अजिंठा आणि वेरूळची चित्रे काढण्यात आली. आता केवळ या दोनच बस शिल्लक राहिल्या आहेत. त्या बसही पुणे मार्गावर चालविण्याचा प्रकार होत आहे.

कोरोनापूर्वी शिवनेरी बसची संख्या-८
जिल्ह्यात सध्या शिवनेरी बसची संख्या-२
मध्यवर्ती बसस्थानकातून पुण्याला धावणाऱ्या शिवशाही-१३
पुणे विभागाच्या औरंगाबादला येणाऱ्या शिवनेरी बस-६

भारमान झाले कमी
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील शिवनेरी बसचे भारमान कमी झाले होते. त्यामुळे काही शिवनेरी बस या पुणे विभागाला पाठविण्यात आलेल्या आहेत.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक.

Web Title: 'Shivneri' of Aurangabad ran to Pune; As there are only two trains left, travel is tight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.