शिवसेना बनणार झेडपीत किंगमेकर...!
By Admin | Published: February 27, 2017 12:26 AM2017-02-27T00:26:36+5:302017-02-27T00:32:07+5:30
जालना : जिल्हा परिषदेत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जालना : जिल्हा परिषदेत बहुमतापासून दूर असल्याने भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय राहिलेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही शिवसेनेशिवाय पर्याय राहिलेला नसल्याने विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. सर्वबाजूंनी विचार करता शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जालना जिल्हा परिषदेची निवडणूक सुरुवातीपासून चांगलीच गाजली आहे. प्रारंभी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या युतीबाबत बैठका झाल्या. जवळपास युतीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे असतानाच शिवसेनेने राज्यस्तरावर भाजपाशी युती तोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे दोन्ही पक्ष जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढले.
प्रचारादरम्यान आरोप प्रत्योरापांच्या फैरी झडल्या. प्रचारात शिवसनेनेला सहानुमूती मिळणार नाही, याची काळजी घेत भाजप नेत्यांनी शिवसेनेवर थेट टीका करणे सोयीस्कररित्या टाळले. तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी जिल्ह्यात सर्वत्र प्रचार सभा घेत भाजपावर टीकास्त्र सोडले. एकूणच सर्व निवडणूक प्रचार हा भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असेच होते. निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला आणि कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले. मतदारांनी कोणत्याही एका पक्षावर विश्वास न दाखविल्याने जागांचे त्रांगडे कायम आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन अंकी जागा मिळाल्या. पण कुणाही एकाला बहुमत नसल्याने सत्तेचे त्रांगडे आगामी काही दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत. आगामी पंधरा ते २० दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)