घरपट्टीवरुन शिवसेनेने सत्ताधाºयांना पकडले कोंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:56 PM2017-08-26T23:56:05+5:302017-08-26T23:56:05+5:30
परभणी महानगरपालिकेत सत्तेवर येऊन जेमतेम चार महिने झालेल्या काँग्रेसला शिवसेनेने घरपट्टी दरवाढीवरून चांगलेच कोंडीत पकडले असून, आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी याबाबत पुढाकार घेवून दोन वेळा आंदोलन केल्याने विरोधकांची गोची झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी महानगरपालिकेत सत्तेवर येऊन जेमतेम चार महिने झालेल्या काँग्रेसला शिवसेनेने घरपट्टी दरवाढीवरून चांगलेच कोंडीत पकडले असून, आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी याबाबत पुढाकार घेवून दोन वेळा आंदोलन केल्याने विरोधकांची गोची झाली आहे़
एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकीत परभणी महानगरपालिकेत सत्तांतर झाले़ अनेक वर्षानंतर काँग्रेसच्या हातामध्ये एकहाती मनपाची सत्ता आली़ मोठ्या तयारीने निवडणुकीत उतरलेल्या शिवसेनेला अंतर्गत मतभेदामुळे फारसे यश आले नसले तरी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावरून शिवसेनेने आता सत्ताधाºयांना कोंडीत पकडण्यास सुुरुवात केली आहे़ गेल्या महिन्यात महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना घरपट्टी वाढी संदर्भात नोटिसा दिल्या़ नोटीस देत असताना ती मोघम स्वरुपात देण्यात आली़ त्यामध्ये संबंधित घरमालकाने बांधकाम परवाना घेतला असेल तर त्यांना ठराविक रक्कम व परवाना घेतला नसेल तर त्यापेक्षा दुप्पट रक्कम घरपट्टी म्हणून भरावी लागेल, असे नमूद केले होते़ गेल्या १८ वर्षांपासून तत्कालीन सत्ताधारी मंडळींनी शहरातील घरपट्टीत वाढच केली नाही़ आता मनपाने तब्बल ११ पटीने घरपट्टीत वाढ केल्याने नागरिक संतापले़ याबाबत शिवसेनेचे आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्याकडे धाव घेऊन अनेकांनी तक्रारी केल्या़ त्यानंतर डॉ़ पाटील यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मनपा आयुक्तांना वाढविलेली घरपट्टी रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन दिले़ ही मागणी मान्य न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला़ या निवेदनावर मनपा प्रशासनाकडून काहीही कारवाई झाली नाही़ त्यानंतर गेल्या आठवड्यात याच विषयावर पत्रकार परिषदही घेतली़ त्यानंतरही कारवाई झाली नसल्याने २४ आॅगस्ट रोजी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले़ या उपोषणास उदंड प्रतिसाद मिळाला़ शिवसैनिकांव्यतिरिक्त अनेक संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून पाठींबा दिला़ अनेक प्रतिष्ठीत नागरिकही आंदोलनात उतरल्याने या उपोषणाला जनआंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाल्याची स्थिती गुरुवारी पहावयास मिळाली़ आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मनपाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करून घरपट्टी दरवाढ मागे घेवून नागरिकांना दिलेल्या नोटिसा रद्द करण्याची मागणी केली गेली़ अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा पुन्हा एकदा इशारा देण्यात आला़ त्यामुळे सद्यस्थिती तरी सत्ताधाºयांना शिवसेनेने कोंडीत पकडले आहे़