कोण अंबादास दानवे? त्यांना खैरे अजून कळला नाही..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 01:21 PM2021-03-19T13:21:50+5:302021-03-19T13:22:56+5:30
Shivsena leader Chandrakant Khaire Vs MLC Ambadas Danave शिवसेनेचे दोन मंत्री व जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी या निवडणुकीसंदर्भात मी शिवसेनेचा नेता असतानाही कसली चर्चा केली नाही, साधे विचारलेही नाही, अशी नाराजी व्यक्त केली.
औरंगाबाद: कोण अंबादास दानवे.. त्याचे नाव घेऊन मी माझे तोंड खराब करू इच्छित नाही, अशा शब्दांत माजी खासदार व शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी गुरूवारी राग व्यक्त केला. तसेच डॉ. कल्याण काळे व सुभाष झांबड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकार बँक विकास पॅनेलला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. हा पाठिंबा खैरे म्हणून नव्हे, तर शिवसेना म्हणून आहे, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
शिवसेनेचे दोन मंत्री व जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी या निवडणुकीसंदर्भात मी शिवसेनेचा नेता असतानाही कसली चर्चा केली नाही, साधे विचारलेही नाही, अशी नाराजी व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून त्यांनी असे काही केले असावे असे वाटत नसल्याचे ते म्हणाले. ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असताना खैरे यांनी त्यात उडी घेतली. गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन अंबादास दानवे यांचे थेट नाव घेऊन व रोहयोमंत्री संदिपान भुमरे व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची नावे न घेता टीका केली.
ते म्हणाले, हरिभाऊ बागडे यांना ही बँक ताब्यात घ्यायची आहे. आता त्यांचे वय झाले आहे. त्यांनी थोडे शांत बसावे. लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधित्व केले पाहिजे. त्यांचे खरेच बँकेत काय काम आहे? पण हरिभाऊंना तर जिल्हा बँक पाहिजे, जिल्हा दूध संघ पाहिजे, साखर कारखाना पाहिजे, देवगिरी बँक पाहिजे, ही हाव योग्य नाही.
आपला राग हरिभाऊ बागडे यांच्यावर आहे की अंबादास दानवे? यांच्यावर असे विचारता, क्षणभरही न थांबता कोण अंबादास दानवे? असा प्रश्न करून खैरे यांनी दानवेबद्दलचा राग व्यक्त केला. शिवसेनेत चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे? हा वाद सतत चालू असतो. जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने तो पुन्हा उफाळून आला आहे. खैरे यांना भुमरे, अब्दुल सत्तार व दानवे? काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी प्रस्थापितांच्या विरोधात सारेजण एकवटत असून बँकेत चमत्कारच घडेल, अशी खात्री खैरे यांनी व्यक्त केली. कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे डॉ. कल्याण काळे यांनी मोबाईलवरूनच भूमिका मांडली. यावेळी सुभाष झांबड, अंबादास मानकापे, नामदेव पवार, नंदकुमार घोडेले, किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, डॉ. पवन डोंगरे, पद्माकर इंगळे आदींची उपस्थिती होती.