'शहाणपणा करू नको, तू ये मग दाखवतो', संदिपान भुमरे आणि शिवसैनिकाची ऑडिओ क्लिप व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 05:57 PM2022-07-24T17:57:18+5:302022-07-24T17:58:06+5:30
शिवसेनेचे बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांची एका शिवसैनिकाशी झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
औरंगाबाद:एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे अनेक आमदार त्यांच्या गटात सामील झाले. यात काही मंत्र्यांचाही समावेश होता, यात संदिपान भुमरेंचा समावेश होता. दरम्यान, या बंडखोरीनंतर शिंदे गटाचे सरकार आले. याविरोधात सध्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा काढत आहेत. या यात्रेवरुन आता संदिपान भुमरे आणि एक शिवसैनिकाची ऑडिओ क्लिव व्हायरल होत आहे.
आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढली. आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा काल संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात होती. या यात्रेनंतर एका शिवसैनिकाने भुमरे यांना फोन केला आणि तुम्ही असं करायला नव्हत पाहिजे, असं म्हटलं. योगेश क्षीरसागर असे या शिवसैनिकाचे नाव असून, ऑडिओ क्लिपमध्ये भुमरे त्या सैनिकाला आधी दम देताना आणि नंतर समजावून सांगाताना दिसत आहेत.
ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
योगेश क्षीरसागर नावाच्या शिवसैनिकाने संदिपान भुमरे यांना फोन लावून म्हटले की, 'साहेब पैठण मतदारसंघात आदित्य ठाकरेंची रॅली निघाली, तुम्हाला मतदान करणारे लोक त्यांच्यासोबत दिसले. तुम्ही असं करायला नको होतं,' असं योगेश म्हणाला. त्यावर भुमरे म्हणाले, 'तु भेट तुला दाखवतो मी असं का केलं. तू भेटायला ये मग सांगतो तुला सगळं,' असं भुमरे म्हणाले. तसेच, 'आदित्य ठाकरेंची रॅली निघाली, त्याला गर्दी झाली. आता आपणदेखील रॅली काढू,' असंही भुमरे म्हणाले.