शिवसेनेचा मोर्चा धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:38 AM2017-09-12T00:38:56+5:302017-09-12T00:38:56+5:30
महानगरपालिकेने केलेल्या अन्यायकारक घरपट्टी आणि मालमत्ता कर वाढीच्या विरोधात सोमवारी शिवसेनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेने केलेल्या अन्यायकारक घरपट्टी आणि मालमत्ता कर वाढीच्या विरोधात सोमवारी शिवसेनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांसह शहरातील नागरिक, व्यापारी, विविध संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.
परभणी महापालिकेने शहरातील नागरिकांना वाढीव घरपट्टी दिली असून, त्याच जोडीला नोटिसाही बजावल्या आहेत. अनेक नागरिकांना पूर्वीच्या घरपट्टीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के वाढीव घरपट्टी दिल्याने नागरिकांत संतापाची भावना निर्माण झाली आहे. या प्रश्नावर खा.बंडू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता शहरातील शनिवार बाजार येथून मोर्चाला प्रारंभ झाला. महापालिकेच्या करवाढी विरोधात घोषणा देत हा मोर्चा शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभूजा देवी मंदिर, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचल्यावर त्या ठिकाणी सभेत रूपांतर झाले.
यावेळी खा.बंडू जाधव, आ. डॉ.राहुल पाटील, सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख विद्याताई सरपोतदार, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ.संजय कच्छवे, माजी आ.मीराताई रेंगे, माजी विरोधी पक्ष नेत्या अंबिका डहाळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, नगरसेवक सचिन अंबिलवादे, रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष डी.एन. दाभाडे, गाळेधारक संघटनेचे चंद्रकांत डहाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या मोर्चात परभणी शहरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दुपारी उकाडा वाढला असतानाही करवाढीचा विरोध करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख नंदू अवचार, सखुबाई लटपटे, संजय गाडगे, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, विश्वास कºहाळे, सचिन गारुडी, बाबू फुलपगार, बाळराजे तळेकर, मकरंद कुलकर्णी, बापू तावडे, उद्धव मोहिते, बन्सी भालेराव, गुणाजी अवकाळे , कुसूम पिल्लेवार, उषा मुंडे आदींसह विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी मोर्चासाठी प्रयत्न केले.