Lok Sabha Election 2019 : जाधव यांच्या रॅलीने शिवसेनेची गुलमंडीवरच कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:14 PM2019-03-30T23:14:45+5:302019-03-31T14:05:19+5:30
आ. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेची त्यांचा बालेकिल्ला असलेल्या क्रांतीचौकासह गुलमंडीवरच कोंडी केली.
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी क्रांतीचौकात शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या विरोधात शड्डू ठोकून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेची त्यांचा बालेकिल्ला असलेल्या क्रांतीचौकासह गुलमंडीवरच कोंडी केली.
क्रांतीचौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आ. जाधव यांच्या रॅलीला वाट करून द्यावी लागली; तर गुलमंडीवर शिवसेनेच्या रॅलीला तब्बल तासभर ताटकळत थांबावे लागले. खा. खैरेंवर हल्लोबोल करणारे आ. जाधव यांचे भाषण शिवसैनिकांना बळजबरीने ऐकावे लागले. क्रांतीचौक ते गुलमंडी परिसरात दुपारी १.२५ ते ४.३० पर्यंत यामुळे तणाव झाला होता. पोलिसांनी ही परिस्थिती कौशल्याने हाताळल्यामुळे अनर्थ टळला.
क्रांतीचौकात आदित्य ठाकरे समजून आ. जाधवांचे स्वागत
खा. खैरेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी क्रांतीचौकातून रॅली निघणार होती. यासाठी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येणार असल्यामुळे सकाळी १० वाजेपासूनच भगवे झेंडे, फेटे बांधून सेनेचे कार्यकर्ते क्रांतीचौकात दाखल होत होते. ढोल-ताशांचा गजर, बँडबाजाचा दणदणाट सुरू होता. भगव्या झेंड्यांनी क्रांतीचौक परिसर फुलून गेला होता. आदित्य ठाकरेंसह खा. खैरे खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनाला गेल्यामुळे रॅली काढण्यास उशीर झाला. सकाळी आलेले कार्यकर्ते उन्हाच्या तडाख्यामुळे निघून जात होते.
पोलिसांनी दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान क्रांतीचौकातून गुलमंडीपर्यंत रॅली काढण्याची परवानगी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. जाधवांना दिली होती. शिवसेनेला सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंतची परवानगी होती. पोलिसांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना रॅली लवकर काढण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. मात्र गर्दी होण्यास वेळ लागत असल्यामुळे रॅली निघत नव्हती. दुपारी १ वाजता पोलिसांची अतिरिक्त तुकडी क्रांतीचौकात दाखल झाली. अदालत रोडवरील पक्ष कार्यालयापासून आ. जाधवांची रॅली क्रांतीचौकाच्या दिशेने निघाली. त्यांच्या रॅलीला मोठी गर्दी झाली होती. आ. जाधव समर्थकांसह क्रांतीचौकात दाखल होताच फटाक्यांची लड लावण्यात आली.
तेव्हा शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदित्य ठाकरे यांची वाट पाहत होते. फटाक्यांची आतषबाजी सुरू होताच शिवसेनेच्या व्यासपीठावरून आदित्य ठाकरे आल्याची वर्दी देण्यात आली. टाळ्यांचा कडकडाट करण्याचा आदेश झाला. तेवढ्यात आ. जाधव यांना समर्थकांनी उचलून घेत जमलेल्या सेनेच्या कार्यकर्त्यात एंट्री केली. ‘सैनिकां’च्या टाळ्या अन् आ. हर्षवर्धन जाधवांची एंट्री’ असा वेगळाच सीन त्यामुळे तयार झाला. पण अचानक दोन्ही बाजूचा जमाव शांत झाला. काय करावे कोणालाच काही सूचेना. सेनेचे कार्यकर्ते खजील झाले होते. सगळ्यांचे चेहरे पडले.
तेवढ्यात सेना महिला आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी आ.जाधवांची रॅली अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांची परवानगी असून, आपण नियमानुसारच रॅली काढल्याचे सांगितले. मात्र महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात करताच आ. जाधवांनी पोलिसांना संरक्षण मागत त्यांच्या रॅलीला सेनेच्या कार्यकर्त्यांमधून वाट मोकळी करून देण्याची मागणी केली. संरक्षण देणार नसाल तर आमच्या पद्धतीने जाऊ असेही सांगितले. पोलिसांची दोन्ही बाजूने कोंडी झाली.
माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी मध्यस्थी करून शिवसेनेचे वाद्ये थांबवून वाट करून देण्याचे आदेश दिले. त्यानंतर आ. जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एक प्रदक्षिणा घालत महाराजांना पुष्पहार अर्पण केला. पुन्हा आ. जाधव यांची रॅली शिवसेनेच्या व्यासपीठासमोरूनच निघाली. तेव्हा आ. जाधवांना त्यांच्या समर्थकांनी खांद्यावर उचलून घेत जोरदार घोषणाबाजी केली. क्रांतीचौकात अर्धा तास सेनेची चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
युतीला टिळकपथवर तासभर पाहावी लागली वाट
दोन वाजता क्रांतीचौकातून निघालेली आ. जाधवांची रॅली तीन वाजता गुलमंडीत पोहोचली. अडीच वाजता शिवसेनेची रॅली क्रांतीचौकातून निघाली. ही रॅली सव्वातीन वाजता पैठणगेटवर पोहोचली. रॅलीमध्ये खा. खैरे यांच्यासह इतर पदाधिकाºयांची वाहने पाठीमागे होती. काही कार्यकर्ते बाराभाई ताजिया चौकात दाखल झाले होते. समोर गुलमंडीवर आ. जाधवांची जाहीर सभा सुरू होती. एक-एक वक्ता जोरदार भाषण करीत होता. पोलिसांनी चौकात तगडा बंदोबस्त लावला होता. राज्य राखीव दलाच्या तुकड्या व रस्त्यावर पोलिसांच्या गाड्या उभ्या केल्या होत्या. पोलिसांनी शिवसेना पदाधिका-यांना गुलमंडीऐवजी दिवाण देवडीमार्गे रॅली नेण्याची विनंती केली. आ.जाधवांच्या सभेला ५ वाजेपर्यंत परवानगी आहे. तोपर्यंत त्यांना रस्त्यातून हटवू शकत नाहीत, असेही निदर्शनास आणून दिले.
तेव्हा पुन्हा प्रदीप जैस्वाल यांनी पोलिसांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याची तयारी दर्शविली. मात्र तेथे कार्यकर्त्यांनी प्रखर विरोध दाखवीत जाणार तर गुलमंडीमार्गेच अशी भूमिका घेतली. त्याच वेळी आ. जाधव यांचे खा. खैरे यांचा नामोल्लेख न करता हल्लाबोल करणारे भाषण सुरू होते. सेनेच्या कार्यकर्त्यांना पुढे जाता येत नव्हते आणि मार्गही बदलायचा नव्हता. त्यामुळे रॅली थांबवून आ. जाधव यांचे भाषण ऐकण्याशिवाय पर्याय उरला नाही. शेवटी पोलीस अधिका-यांनी आ. जाधव यांनाच सभा उरकती घेण्याची विनंती केली. परंतु आ. जाधव यांनी नियमावर बोट ठेवले. काही लोक दंगल करण्याच्या बेतात आहेत, आपणाला धर्मनिरपेक्ष, सहिष्णू मार्गाने जायचे आहे. त्यामुळे आपणच उरकते घेऊत, अशी घोषणा करून त्यांनी भाषण थांबविले. तोपर्यंत चार वाजून गेले होते. आ. जाधवांचे भाषण संपल्यानंतर त्यांनी समर्थकांना पक्ष कार्यालयात येण्याची सूचना केली. तेव्हाच पोलिसांनी सभास्थळी असलेल्या खुर्च्या गोळा करण्याचे आदेश देत सेनेची झालेली कोंडी फोडत रस्ता मोकळा करून दिला.
अन् रॅली मार्गस्थ झाली
शिवसेनेच्या रॅलीला स्वत:च्या बालेकिल्ल्यातच तासभर ताटकळावे लागले. पोलिसांनी आ.जाधवांना विनंती केल्यामुळे त्यांनी सभा उरकती घेतली. तासाभराच्या वेटिंगनंतर गुलमंडीचा रस्ता रिकामा झाला. त्यानंतर साडेचार वाजता शिवसेनेची रॅली गुलमंडीवरून पुढे मार्गस्थ झाली. गुलमंडीवर सेनेच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. आ. जाधव यांच्या व्यासपीठाजवळच फटाके फोडण्याचा प्रयत्न करणाºया सेनेच्या कार्यकर्त्यांना भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी रोखले. ताटकळल्यामुळे रॅलीमधील बहुतांश नागरिकांनी घरचा रस्ता धरल्याचे चित्रही यावेळी पाहायला मिळाले.