शिवसेनेचा सकाळी होकार, रात्री नकार का?; भाजपकडून चारही बाजूंनी सेनेची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 04:07 PM2018-08-29T16:07:09+5:302018-08-29T16:08:50+5:30
रात्री ७ वाजता जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा महापौरांनी ऐनवेळी निर्णय फिरविला, असा आरोप भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी केला.
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीची शिल्पकार शिवसेनाच असल्याचे मागील दहा वर्षांपासून नेते सांगत आहेत. शहरातील १५ लाख नागरिकांची तहान भागविणारा प्रकल्प राज्य शासनाच्या मदतीने मार्गी लागत आहे. त्यात अडथळे आणण्याचे कामही स्थानिक सेना नेते करीत आहेत. सोमवारी सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी सेना ठराव मंजूर करण्याच्या बाजूने होती. रात्री ७ वाजता जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा महापौरांनी ऐनवेळी निर्णय फिरविला, असा आरोप भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात समांतरच्या मुद्यावर व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यावेळी अधिकाऱ्यांसह महापौरही उपस्थित होते. महापौरांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला होता की, २७ आॅगस्ट रोजी समांतरचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत महापौरांनीच निधीचा मुद्दाही उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांनी तुम्ही निधीची अजिबात चिंता करू नका, राज्य शासन सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. तुम्ही फक्त ठरावावर निर्णय घ्या, असे नमूद केले होते.
एकीकडे मुख्यमंत्र्यांना ठराव मंजूर करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.
दुसरीकडे सर्वसाधारण सभेत शेवटच्या घटकेला निर्णय बदलला. सेनेला राज्य शासनावर विश्वास का नाही.? यापूर्वी १०० कोटी रुपये रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले. ९० कोटी रुपये घनकचऱ्यासाठी दिले. २४ कोटी रुपये रस्त्यांसाठी दिले. समांतरसाठी शासन निधी देण्यास तयार आहे. १०० कोटी रुपये रस्त्यांचे खर्च होताच आणखी १०० कोटी रुपये देण्याची भूमिका शासनाची आहे. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री वारंवार सांगत असताना सेनेने शासनावर दाखविलेला अविश्वास चुकीचा असल्याचे विजय औताडे यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.
सेनेने शहराला वेठीस धरले
समांतर जलवाहिनी प्रकल्प मार्गी लागत असताना त्यात अडथळे कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात येत आहेत, हे जनतेलाही आता कळून चुकले आहे. सोमवारी सर्वसाधारण सभा सुरू असताना रिमोटचे बटन कोणी दाबले हे आम्ही सांगण्याची गरज नाही. समांतर प्रकल्प मीच आणला, आपणच याचे शिल्पकार आहोत, असे वारंवार सांगणाऱ्या सेना नेत्यांनीच महापौरांना निर्णय बदलण्यास भाग पाडल्याचा आरोपही उपमहापौरांनी केला.
भेट हवी का गळाभेट...
समांतरचा ठराव मंजूर करण्यासाठी सेना नेत्यांची कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कशासाठी भेट घ्यावी. निव्वळ भेट घेऊन चालणार नाही, त्यांना गळाभेट हवी आहे, असा आरोपही उपमहापौर विजय औताडे यांनी केला.