शिवशाही बसही सुसाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:02 AM2021-09-06T04:02:02+5:302021-09-06T04:02:02+5:30
औरंगाबाद : एसटी महामंडळाने ट्रॅव्हल्सच्या स्पर्धेत उतरत शिवशाही ही वातानुकूलित बससेवा सुरू केली. ‘लालपरी’पाठोपाठ या बससेवेच्या माध्यमातून ‘एसटी’ची ...
औरंगाबाद : एसटी महामंडळाने ट्रॅव्हल्सच्या स्पर्धेत उतरत शिवशाही ही वातानुकूलित बससेवा सुरू केली. ‘लालपरी’पाठोपाठ या बससेवेच्या माध्यमातून ‘एसटी’ची नवी ओळख निर्माण झाली. सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकातून ५२ शिवशाही बस धावत असून, या बससेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात २०१७ मध्ये शिवशाही या वातानुकूलित बस दाखल झाल्या. यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचा समावेश होता.
काेरोना काळात ‘एसटी’च्या शिवशाही कमी प्रमाणात धावल्या. आता एसटी महामंडळाने स्वमालकीच्या शिवशाही बसच चालविण्यावर भर दिला आहे. सिडको बसस्थानकातून १५ आणि मध्यवर्ती बसस्थानकातून ३७ शिवशाही बस धावत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकातून कोरोनापूर्वी भोडतत्त्वावरील २० शिवशाही बस धावत होत्या; परंतु या भाडेतत्त्वावरील बस बंद आहेत. पुणे मार्गावर सर्वाधिक शिवशाही बस सोडण्यात येत आहेत. एसटी महामंडळाच्याच शिवशाही बस धावत असल्याने उत्पन्नात भर पडण्यास मदत होत आहे.
-------
- जिल्ह्यातील एकूण आगार- ८
- सुरू असलेल्या शिवशाही- ५२
- एकूण शिवशाही- ५२
------
बसचे दररोज सॅनिटायझेशन
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील शिवनेरी, शिवशाही, साधी बस अशा ३६५ बसगाड्यांना ‘अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग’ करण्यात येत आहे. प्रवासादरम्यान आरोग्याच्या दृष्टीने हे तंत्र ‘सुरक्षा कवच’ ठरणार आहे. त्याबरोबरच बसस्थानकातून रवाना होण्यापूर्वी बसगाड्यांचे सॅनिटायझेशन करण्यावर भर दिला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
-------
या मार्गावर सुरू आहेत शिवशाही
-औरंगाबाद-पुणे
-औरंगाबाद-मुंबई
-औरंगाबाद-बोरिवली
-औरंगाबाद-अलिबाग
-औरंगाबाद-नाशिक
-औरंगाबाद-कोल्हापूर
- औरंगाबाद-नागपूर
-औरंगाबाद-लातूर
- औरंगाबाद-नांदेड
-औरंगाबाद-अकोला
---
सर्वच मार्गांवर प्रतिसाद
सिडको बसस्थानकात सध्या १५ शिवशाही बसगाड्या आहेत. या बस विविध मार्गांवर धावत आहेत. या सर्वच बस महामंडळाच्या आहेत. प्रवाशांचा सर्वच मार्गांवर प्रतिसाद मिळत आहे. सिडको बसस्थानकाकडे भाडेतत्त्वावरील शिवशाही बस नाहीत.
- लक्ष्मण लोखंडे, आगार व्यवस्थापक, सिडको बसस्थानक