शिवशाही बसला ट्रॅव्हल्सची धडक : ६८ प्रवाशी बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 07:19 PM2019-04-07T19:19:35+5:302019-04-07T19:19:52+5:30
दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचालकाने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने शिवशाही बसला मागून जोराची धडक दिली.
वाळूज महानगर : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचालकाने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने शिवशाही बसला मागून जोराची धडक दिली. ही घटना रविवारी सकाळी सिडको वाळूज महानगरातील गोविंद हिल चौकात घडली. यात सुदैवाने दोन्ही बसमधील ६८ प्रवाशी बालंबाल बचावले. मात्र, दोन्ही बसचे नुकसान झाले आहे.
औरंगाबाद-पुणे ही शिवशाही बस (एमएच-०४, जेके-२८५०) शनिवारी सकाळी ४१ प्रवाशी घेवून औरंगाबाद येथून पुण्याला जात होती. तर शिवशाही बसच्या मागोमाग नागपूर-पुणे ही खाजगी ट्रॅव्हलस (एमएच-०३, सीपी- ७९७८) ही याच दरम्यान२७ प्रवाशांसह पुण्याकडे जात होती. दरम्यान, सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिवशाहीसमोरील पोलीस व्हॅनने सिडको वाळूज महानगरातील गोविंद हिल चौकातून अचानक सिडकोच्या दिशेने वळण घेतले.
याचवेळी पंढरपूरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने पोलीस व्हॅनपासून स्वत:ला वाचविण्यासाठी आपली दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला घातली. अचानक दुचाकी समोर आल्याने शिवशाही बसचालक विलास देवरे याने ब्रेक दाबला. पाठीमागून भरधाव येणाºया ट्रॅव्हल्सने शिवशाहीला मागून जोराची धडक दिली. यात सुदैवाने दोन्ही बसमधील ६८ प्रवासी सुखरुप राहिले. अपघातग्रस्त दोन्ही बस वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर उभ्या केल्या. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.