दरमहा १०० कोटींचा शॉक
By Admin | Published: June 21, 2017 12:01 AM2017-06-21T00:01:19+5:302017-06-21T00:09:14+5:30
औरंगाबाद : महावितरण कंपनीला दरमहा वीज चोरीचा फटका बसत असून, ११ जिल्ह्यांतून दरमहा अंदाजे १०० कोटी रुपयांचे नुकसान वीज चोरीतून कंपनीला सहन करावे लागत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महावितरण कंपनीला दरमहा वीज चोरीचा फटका बसत असून, ११ जिल्ह्यांतून दरमहा अंदाजे १०० कोटी रुपयांचे नुकसान वीज चोरीतून कंपनीला सहन करावे लागत आहे. वीज चोरीला आळा घालणे आणि थकबाकी वसूल करण्याचे आवाहन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी प्रादेशिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत केले.
अचूक मीटर रीडिंग घेऊन एजन्सीज् वेळेत वीज ग्राहकांना बिले देत नसतील तर रीडिंग घेण्याचे काम आयटीआय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जालना जिल्ह्यातील १०८ गावांमध्ये कायमस्वरुपी तसेच ३३ वीज वाहिन्यांवरील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांचे प्रमाणदेखील ६०-७० टक्के असून, चालू वीजपुरवठा असलेले फक्त ३०-४० टक्के च ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांनी बिलाचा भरणा न केल्यास वाहिनीचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा त्यांनी दिला. जळगाव परिमंडळातील धुळे मंडळात १९ टक्के व जळगाव मंडळामध्ये २४ टक्के तर नंदुरबार जिल्ह्यात २७ टक्के वीज गळतीचे प्रमाण आहे. त्यामुळे धुळे मंडळात दरमहा १४ कोटी, नंदुरबार जिल्ह्यात ३६ कोटी, तर धुळे मंडळात साडेबारा कोटी रुपये, असे एकूण ६२ कोटी ४ लाख रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.
औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत महसुली तुटीमुळे पायाभूत सुविधांची कामे करणे कठीण होत असून, त्याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होत आहे. बैठकीला सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता बी. के. जनवीर, गणपत मुंडे आदींची उपस्थिती होती.