धक्कादायक ! १० दिवसांच्या कोरोनाबाधित बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 02:09 PM2020-09-08T14:09:25+5:302020-09-08T14:15:00+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण मयत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७५७ झाली आहे.
औरंगाबाद : हिंगोली जिल्ह्यातील १० दिवसाच्या कोरोनाबाधित बालकाचा औरंगाबादेत उपचार सुरू असताना दुर्दैवाने मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण मयत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७५७ झाली आहे.
धवला, औंढा (हिंगोली) येथील या १० दिवसाच्या शिशूला नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ७ सप्टेंबर रोजी घाटीत रेफर करण्यात आले होते. या शिशुचा कोरोना अहवाल ५ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी दुर्दैवाने या शिशूने अखेरचा श्वास घेतला.
याबरोबरच औरंगाबाद जिल्ह्यातील भगूर-वैजापूर येथील ५० वर्षीय पुरुष , पदमपुरा येथील ८५ वर्षीय महिला, बालाजीनगर येथील ४६ वर्षीय पुरुष, कटकट गेट येथील ६४ वर्षीय महिला आणि नंदनवन कॉलनी, भवसिंगपुरा येथील ७० वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
जिल्ह्याची रुग्णसंख्या २६ हजाराच्या घरात
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, सोमवारी दिवसभरात ४३८ नव्या रुग्णांची भर पडली, तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजार ९७९ झाली आहे. यात आतापर्यंत १९ हजार ८९४ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७५७ झाली आहे. तर ५ हजार ३२७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.