खळबळजनक ! उच्चभ्रू वसाहतीत कचऱ्यात सापडली १५ जिवंत काडतुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 05:24 PM2021-07-30T17:24:42+5:302021-07-30T17:25:07+5:30

live cartridges found in Aurangabad : बॅगमधील कचऱ्याचे वर्गीकरण करताना एका पिशवीत जिवंत काडतुसे आढळली.

Shocking! 15 live cartridges were found while dumping garbage in the bell cart | खळबळजनक ! उच्चभ्रू वसाहतीत कचऱ्यात सापडली १५ जिवंत काडतुसे

खळबळजनक ! उच्चभ्रू वसाहतीत कचऱ्यात सापडली १५ जिवंत काडतुसे

googlenewsNext
ठळक मुद्देआकाशवाणी समोरील संत एकनाथ सोसायटी येथील घटना

औरंगाबाद : आकाशवाणी समोरील एकनाथ हाऊसिंग साेसायटीत कचरा घेऊन जाणाऱ्या घंटागाडीत कचऱ्याची बॅग टाकताना त्यातील एका पिशवीत जिवंत १५ काडतुसे आढळली. घंटागाडीतील कर्मचाऱ्यांनी जिन्सी पोलिसांना ही माहिती दिली. जिन्सी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत जिवंत काडतुसे ताब्यात घेतली. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. ही काडतुसे अन्य कोणाच्या हातात पडली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

एकनाथनगर हाऊसिंग सोसायटी ही उच्चभ्रू वस्ती आहे. या सोसायटीमधील रस्त्यावरील बॅगमधील कचरा घंटागाडीत टाकण्यात येत होता. कचरा जमा करणारे कर्मचारी ओला, सुकासह इतर कचऱ्याचे वर्गीकरण करतात. बॅगमधील कचऱ्याचे वर्गीकरण करताना एका पिशवीत जिवंत काडतुसे आढळली. सफाई कामगार संतोष कचरू चाबुकस्वार यांनी ही काडतुसे व्यवस्थित ठेवून तात्काळ जिन्सी पोलिसांना माहिती दिली. जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, राजेश मयेकर, उपनिरीक्षक मच्छिंद्र पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पथकाने या काडतुसांची तपासणी केली. तेव्हा १२ बोअरची दोन आणि २२ पॉइंटची १३ जिवंत काडतुसे असल्याचे स्पष्ट झाले. दोन पंचांना बोलावून घेत पंचनामा करून काडतुसे जप्त करण्यात आली. जिवंत काडतुसे बेकायदेशीरपणे बाळगून जाणीवपूर्वक सार्वजनिक रस्त्यावर बेवारसपणे टाकून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे कृत्य केल्याबद्दल अज्ञात व्यक्तीच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी उपनिरीक्षक मच्छिंद्र पवार यांनी तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गिते अधिक तपास करीत आहेत.

जीवितास धोका
जिवंत १५ काडतुसांपासून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. या काडतुसांवर कशाचाही भार पडला असता तर त्यांचा स्फोटही झाला असता, मात्र घंटागाडीतील कचरा जमा करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणार
परिसरातील एका प्रसिद्ध दवाखान्याजवळच १५ जिवंत काडतुसे सापडल्यामुळे एकनाथनगरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. या परिसरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले आहेत. या सर्व फुटेजची तपासणी केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या फुटेजमधून कचऱ्याची बॅग ठेवणारा शोधला जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Shocking! 15 live cartridges were found while dumping garbage in the bell cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.