धक्कादायक ! औरंगाबादमधून १६ दिवसांमध्ये १५ जण झाले बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 01:03 PM2021-08-19T13:03:37+5:302021-08-19T13:06:31+5:30
१५ जणांमध्ये सहा महिलांचा समावेश
- राम शिनगारे
औरंगाबाद : शहर पोलीस हद्दीतून व्यक्ती बेपत्ता होण्याची संख्या मागील १५ दिवसांमध्ये अचानक वाढली आहे. १६ दिवसांमध्ये तब्बल १५ जण घर सोडून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात सहा महिलांचा समावेश आहे. त्याचवेळी चार अनोळखी व्यक्तींचा मृत्यूही झाला आहे. शहरातील पोलीस ठाण्यांनी 'लोकमत'ला ही माहिती पाठविली आहे.
शहरात १ ऑगस्टपासून सहा महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये नातेवाइकांनी नोंदविल्या आहेत. यात दौलताबाद येथील मनोजकुमार पंकजलाल राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बहीण नीतूसिंग राजसिंग राजपूत (वय २६) ही २ ऑगस्ट रोजी घरातून निघून गेली. विष्णुनगरातील श्वेता कृष्णा पवार (२०) ही सुद्धा २ ऑगस्ट रोजी दवाखान्यात जाते असे सांगून घरातून गायब झाली. याविषयी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. कीर्ती सचिन वाघ (३७) या घरातून १५ हजार रुपये घेऊन नाशिकला माझ्या घरी जायचे असे म्हणून ३० जुलैला घराबाहेर पडल्या. त्या बेपत्ता झाल्याची नोंद क्रांतीचौक पाेलीस ठाण्यात आहे. सिटीचौक पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार राजश्री ऊर्फ आयेशा छत्रपाल मानसिंह भघेल (३३) या ५ ऑगस्ट रोजी घरातून निघुन गेल्या. लक्ष्मी प्रकाश लोखंडे (३०) या पाच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन २ ऑगस्ट रोजी सकाळीच घराबाहेर पडल्या.
याविषयी उस्मानपुरा पोलिसांत नोंद करण्यात आलेली आहे. सातारा पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार पूजा विजय हिरे (२९) या एक मुलगी व मुलगा सोबत घेऊन १६ ऑगस्ट रोजी निघून गेल्या आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या महिलांशिवाय इतर ९ व्यक्तीही मागील १६ दिवसांत निघून गेल्या आहेत. रोहित रतन कोठावळे (२२), कृष्णा मनोहर वीर (२६), अभिषेक आप्पासाहेब आंधळे (१७), दीपक विलास गुंजाळ (३०), पंढरीनाथ शंकर तांगडे (७०), पवन जगन्नाथ बोधक (४१), विनोद सुधाकर कापुरे (५२), शेख जाकेर शेख हमीद (३८) आणि पद्माकर अशोक कुलकर्णी (४४) हे घरातून निघून गेल्याच्या नोंदी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आलेल्या आहेत. मागील १६ दिवसांमधील या घटनांमुळे पोलीस दलातही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय शहर आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये चार अनोळखी व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटविण्याचे काम विविध स्तरावर करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
व्यक्तिगत कारणातून हे प्रकार
बेपत्ता होण्याचे प्रकार हे व्यक्तिगत कारणातून होत असतात. त्यात संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील परिस्थिती, वर्तन जबाबदार असते. प्रेम, कौटुंबिक कलह यातून हे प्रकार वाढत आहेत. त्यावर व्यापक प्रमाणात जनजागृती आणि कुटुंबस्तरावरच समस्या सोडविणे गरजेचे आहे.
- रवींद्र साळोखे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा