धक्कादायक ! प्रेमप्रकरणातून १६ ते १७ वर्षांच्या मुली लग्नाच्या आमिषाला पडतात बळी; सोडतात आईवडिलांचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 01:42 PM2020-12-19T13:42:19+5:302020-12-19T13:46:16+5:30
crime news in Aurangabad, Missing Minor Girl : बेपत्ता अथवा घरातून निघून गेलेल्या १८ वर्षांखालील मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी देशभरात १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे.
- बापू सोळुंके
औरंगाबाद: प्रेमप्रकरणातून १६ ते १७ वर्षांच्या मुली आईवडिलांचे घर सोडून प्रियकरासोबत निघून जातात तर आईवडील अभ्यासासाठी तगादा लावतात म्हणून १८ वर्षांखालील मुले घरातून पळून जातात. बेपत्ता अथवा घरातून निघून गेलेल्या १८ वर्षांखालील मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी देशभरात १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे. शहर पोलिसांनी पंधरा दिवसांत ८ मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची पोलिसांनी दिली.
स्टोरी क्रमांक १ : अभ्यासासाठी तगादा लावतात म्हणून घर सोडले
आईवडील अभ्यासासाठी तगादा लावतात म्हणून, दहावीत शिकणारा रोहन (नाव बदलले) घर सोडून थेट रेल्वेने मुंबईला गेला. घराबाहेर पडताना त्याने घरातील १८ हजार रुपये नेले होते. जवळचे सर्व पैसे खर्च होईपर्यंत तो हॉटेलमध्ये राहिला. मात्र, पैसे संपताच त्याने त्याच परिसरातील एका हॉटेलमध्ये काम सुरू केले. औरंगाबाद सोडल्यापासून रोहनने ना घरी संपर्क साधला होता ना मित्रांना. सोबत तो त्याचे दप्तर आणि कपडे शाळेच्या बॅगेत घेऊन गेला होता. इकडे त्याचे आईवडील त्याच्या शोधार्थ खूप प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांना यश येत नव्हते. मात्र, तो मुंबई पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. आणि त्याला परत आणण्यात पोलिसांना यश आले.
स्टोरी क्रमांक २ : दारुडा नवरा मारतो म्हणून आई पोटच्या मुलांकडून भीक मागून घेते
ऑपरेशन मुस्कानअंतर्गत पोलिसांनी क्रांती चौकात भीक मागणाऱ्या ९ ते १० वर्षांच्या डॉलीला ताब्यात घेतले तेव्हा उड्डाणपुलाखाली बसलेली तिची आईच तिच्याकडून भीक मागायला लावत असल्याचे समजले. पोलिसांनी बालिकेच्या आईला गाठले तेव्हा तिने दिलेल्या माहितीनुसार, तिला चार मुले आहेत. बिडकीन येथे राहणारा तिचा पती कोणताही कामधंदा करीत नाही. उलट दारू पिऊन सतत मारहाण करतो. यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून औरंगाबादला आली. सिग्नलवर मिळणाऱ्या भिकेवर पोट भरतो.
स्टोरी क्रमांक ३ : लग्नाच्या आमिषाने प्रियकरासोबत ठोकली धूम
शहरातील रहिवासी १७ वर्षांची तरुणीने प्रेमप्रकरणात तिच्यापेक्षा पाच वर्षांने मोठा असलेल्या प्रियकराने दाखविलेल्या लग्नाच्या आमिषाला बळी पडून घर सोडले. आई कामावरुन घरी गेल्यावर ती घरी नसल्याचे पाहून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती दुचाकीस्वारासोबत स्वतःहून गेल्याचे समजले. पोलिसांनी तपास करून दोघांना पुण्यातून पकडून आणले. तेव्हा तिने दिलेल्या माहितीवरुन, तिच्या प्रियकरावर बाललैगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला जेलमध्ये टाकले. ती मात्र आईकडे जाण्यास तयार नसल्यामुळे शेवटी तिला बालिका सुधारगृहात ठेवले.
पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत होतो तपास
अल्पवयीन मुला-मुलींच्या हरवल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत या गुह्याचा तपास केला जातो. यावर्षी अकरा महिन्यांत ४२ मुले आणि ८४ मुली घरातून निघून गेल्याच्या घटना घडल्या. यापैकी ४२ मुले आणि ७८ मुलींचा शोध घेऊन त्यांना परत त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. उर्वरित ६ मुलींचा शोध पोलीस घेत आहेत. शिवाय ऑपरेशन मुस्कानअंतर्गत डिसेंबर महिन्यात भीक मागणारी मुले, हॉटेल, वीटभट्टी येथे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या स्वाधीन केले जात आहे.
- सुरेश वानखेडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा.
औरंगाबाद शहरात अकरा महिन्यांत हरवलेली आणि शोधून आणलेली मुला- मुलींची आकडेवारी :
महिना- मुले-मुली- सापडलेली मुले-मुली
जानेवारी- ११ --- ११
फेब्रुवारी - १५ --- १३
मार्च ----- १७ ----- १७
एप्रिल ----- २ ------ २
मे ------ ५------- ५
जून --- १३ ----१३
जुलै ------ १०-- १०
ऑगस्ट ---१५ ---१३
सप्टेंबर ---१५ ----- १५
ऑक्टोबर --१५ ----१४
नोव्हेंबर ------८ ---७