धक्कादायक! पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; कोरडे वस्तीत पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 05:50 PM2020-04-12T17:50:15+5:302020-04-12T17:50:46+5:30

पैठण तालुक्यात दोन दिवसात दहाजणांचा पाण्यात बुडून मृत्यू ओढवल्याने तालुकाभर शोककळा पसरली आहे.

Shocking! 5 Death in same family drowned in water in Paithan | धक्कादायक! पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; कोरडे वस्तीत पसरली शोककळा

धक्कादायक! पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; कोरडे वस्तीत पसरली शोककळा

googlenewsNext

पैठण -  तालुक्यात शनिवारी विविध घटनेत पाच जणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेस २४ तास उलटत नाही तोच आज पुन्हा विहामांडवा येथे शेततळ्यात पोहत असताना जीवरक्षक दोर तुटल्याने बुडून चार विद्यार्थ्यांसह एका जणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विहामांडवा ता पैठण येथील कोरडे वस्तीतील एकाच कुटुंबातील हे पाच जण असल्याने या कुटुंबावर दु:खा चा डोंगर कोसळला आहे.
मृत पावलेल्या पाच जणात बाप- लेक व दोन सख्खा भावाचा समावेश आहे. दोन दिवसात दहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याने पैठण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

लक्ष्मण निवृत्ती कोरडे (४२), वैभव रामनाथ कोरडे (१२), सार्थक लक्ष्मण कोरडे (९), समर्थ ज्ञानदेव कोरडे (७), अलंकार रामनाथ कोरडे (९) अशी आजच्या घटनेत बुडून मरण पावलेल्यांची नावे आहेत. यात लक्ष्मण कोरडे व त्यांचा मुलगा  सार्थक यांच्यासह वैभव व अलंकार कोरडे या दोन सख्खा भावांचा समावेश आहे.  दुपारच्या समयी ही दुर्देवी घटना घडल्याने वस्तीवरील नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. घटनेमुळे विहामांडवा परिसरात शोककळा पसरली.

आज दुपारी कोरडे वस्तीवरील लक्ष्मण कोरडे हे मुलगा व पुतणे यांना पोहणे शिकविण्यासाठी वस्तीवरील शेततळ्यात घेऊन गेले. दरम्यान, पोहताना बुडू नये म्हणून दोर शेततळ्यात सोडण्यात आली होती. सुरवातीला लक्ष्मण  कोरडे हे शेततळ्यात मुलांसोबत होते, मुलांना दोर धरूण पोहण्याच्या  सूचना दिल्यानंतर ते बाहेर आले. लक्ष्मण कोरडे बाहेर येताच काही वेळातच शेततळ्यात बांधलेला दोर तुटला व चारही मुले पाण्यात बुडू लागली यावेळी मुलांनी केलेला आरडाओरडा लक्ष्मण कोरडे यांच्या कानावर पडला त्यांनी धावत जात शेततळ्यात मुलांना वाचविण्यासाठी उडी मारली. परंतु, दोर तुटलेला असल्याने व शेततळे शेवाळलेले असल्याने त्यांनी मदतीसाठी धावा केला मात्र ऐकण्यासाठी कुणीही नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही, शेवटी पाचही जण पाण्यात बुडाले. घटना समताच सर्वांना पाचोड येथील रूग्णालयात हलविण्यात आले, मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.

पैठण तालुक्यात दोन दिवसात दहाजणांचा पाण्यात बुडून मृत्यू ओढवल्याने तालुकाभर शोककळा पसरली आहे. या दहा पैकी सात जणांचा मृत्यू शेततळ्यात बुडून झाल्याने शेततळ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेततळ्यात बुडून दुर्घटना होऊ नये म्हणून उपाय योजना राबविणे काळाची गरज असल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.  एकाच दिवशी खेळते बागडते चार बालके व एक तरूण गेल्याने कोरडे वस्ती सुन्न झाली आहे. बालकांच्या मातांनी केलेला आक्रोश हेलावून टाकणारा होता. दरम्यान विहामांडवा येथील नागरिकांनी वस्तीवरील नागरिकांना धीर दिला आहे.

Web Title: Shocking! 5 Death in same family drowned in water in Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी