धक्कादायक, कोरोनाकाळात ९६४ नवजात शिशूंचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:04 AM2021-09-21T04:04:47+5:302021-09-21T04:04:47+5:30

- संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात जिल्ह्यात नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण दुपटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Shocking, 964 infant deaths during the Corona period | धक्कादायक, कोरोनाकाळात ९६४ नवजात शिशूंचा मृत्यू

धक्कादायक, कोरोनाकाळात ९६४ नवजात शिशूंचा मृत्यू

googlenewsNext

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात जिल्ह्यात नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण दुपटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एप्रिल-२०२० ते ऑगस्ट २०२१ या अवघ्या १७ महिन्यांमध्ये तब्बल ९६४ नवजात शिशूंचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणा कोरोना नियंत्रणात आणि उपचारातच व्यस्त राहिली. परिणामी, गरोदर मातांच्या आरोग्यसेवांकडे दुर्लक्ष झाल्याने नवजात शिशूंचा मृत्युदर वाढल्याची भीती व्यक्त होत आहे.

गरोदर मातांसाठी आरोग्य विभागातर्फे विविध सेवा दिल्या जातात. मात्र, मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या लाटेत लाॅकडाऊन पाळण्यात आले, तर दुसऱ्या लाटेतही निर्बंध लावण्यात आले होते. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येपुढे आरोग्य यंत्रणेची कसोटी लागली. त्यामुळे कोरोना रोखण्यातच सगळी यंत्रणा कामाला लागली होती. या सगळ्यात गरोदर मातांच्या आरोग्यसेवांकडे फारसे लक्ष देता आले नाही. गरोदर मातांना लोहयुक्त गोळ्या, धनुर्वाताचे इंजेक्शन देणे, त्यांची सोनाेग्राफी करणे, आदी सेवा अनेक दिवस ठप्प राहिल्या. या सगळ्यामुळे एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत एप्रिल २०२० ते २०२१ या वर्षात नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या १७ महिन्यांत ९६४ नवजात शिशूंनी जन्मताच जगाचा निरोप घेतला. यामध्ये गेल्या ५ महिन्यांतच २५४ नवजात शिशूंचा जन्मजात मृत्यू झालेला होता. आरोग्य यंत्रणेने किमान यापुढे तरी नवजात शिशूंचा मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

------

नवजात शिशूंच्या मृत्यूची कारणे

- गरोदर मातांच्या आहाराकडे दुर्लक्ष.

- औषधोपचारांकडे दुर्लक्ष.

- आरोग्य केंद्रांऐवजी घरगुती उपचार.

- कोरोनाच्या भीतीने थेट प्रसूतीसाठी जाणे.

- सोनोग्राफीअभावी गर्भातील स्थिती न समजणे.

- नवजात शिशूंना जंतुसंसर्ग

- नवजात शिशूंचे वजन कमी असणे.

---

आढावा घेणार

गरोदर मातांना आरोग्य सेवा देण्यात येतात. कोरोनाकाळात त्यावर थोडासा परिणाम झाला. शिवाय अनेकजण कोरोनाच्या भीतीने नियमित तपासणीसाठी रुग्णालयात येत नव्हते. नवजात शिशूंच्या मृत्यूच्या परिस्थितीचा लवकरच आढावा घेतला जाईल.

- डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी

------

जिल्ह्यातील एकूण प्रसूती

२०१९-२० : ७१,३४५

२०२०-२१ : ७१,३४८

२०२१ (एप्रिल ते ऑगस्ट) : ३०,१८२

--------

नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण

२०१९-२० : ३७३

२०२०-२१ : ७१०

२०२१ (एप्रिल ते ऑगस्ट) : २५४

----------

Web Title: Shocking, 964 infant deaths during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.