धक्कादायक! गावातील रस्ता बंद केल्यावरून मागासवर्गीय दाम्पत्यास वाळीत टाकले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 07:23 PM2022-07-27T19:23:24+5:302022-07-27T19:26:43+5:30
पीडित कुटुंबाने सिल्लोड ग्रामीण पोलीस व मानवी हक्क आयोगाकडे मंगळवारी तक्रार केली आहे.
सिल्लोड : तालुक्यातील वांजोला येथील एका मागासवर्गीय दाम्पत्याला गावातील रस्ता बंद केल्याच्या कारणावरून उपसरपंच व इतरांनी वाळीत टाकल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पीडित कुटुंबाने सिल्लोड ग्रामीण पोलीस व मानवी हक्क आयोगाकडे मंगळवारी तक्रार केली आहे.
सिल्लोड तालुक्यातील वांजोला येथील दीपक म्हातारजी सुरडकर (वय ६५ वर्षे) व कडूबाई दीपक सुरडकर (वय ६० वर्षे) व त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या घराशेजारचा रस्ता चारी खोदून बंद केला आहे. त्यामुळे तेथून इतर ग्रामस्थांना शेतात जाण्यास अडचण होत आहे, असे कारण देऊन २६ जून रोजी गावात दवंडी देऊन, सुरडकर परिवारास गावातील उपसरपंच रमेश काकडे व सुरडकर यांच्या भावकीतील व्यक्तींनी वाळीत टाकले.
त्यांच्या परिवारासोबत कोणीही बोलू नये, त्यांच्या घरी कोणीही जाऊ नये, त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे समाजिक संबंध ठेवू नयेत, त्यांना बौद्ध विहारामध्ये प्रवेश देऊ नये, कुठल्याही दुकानातून सामान देऊ नये किंवा गावातील कुठल्याही व्यक्तींनी त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारे व्यवहार करू नये, असे दवंडी देऊन गावात कळविल्याचा आरोप दीपक सुरडकर यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. ही घटना २६ जून रोजी घडली होती. त्यानंतर, सर्व सुरळीत होईल, असे वाटत असल्याने तक्रार दिली नव्हती. मात्र, त्रास वाढल्याने २६ जुलै रोजी सिल्लोड ग्रामीण पोलीस, पोलीस अधीक्षक व मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केल्याचे सुरडकर म्हणाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीत उपसरपंच रमेश अर्जुन काकडे यांच्यासह १८ जणांची नावे आहेत.
तक्रारच आलेली नाही...
गावात रस्त्यावरून काही वाद झाले होते. मात्र, त्या कुटुंबाला कुणी वाळीत टाकले, याची आमच्याकडे अजून तरी तक्रारच आलेली नाही. तक्रार आली, तर चौकशी केली जाईल.
- सीताराम मेहेत्रे, पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण.
गावाच्या रस्त्याचा वाद आहे
या इसमाने गावकऱ्यांचा रस्ताच चारी खोदून बंद केला होता. तो ग्रामपंचायतीमार्फत मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी बदला घेण्यासाठी खोटी तक्रार केली आहे.
- रमेश काकडे उपसरपंच धानोरा-वांजोला ग्रुप ग्रामपंचायत.
शेतात राहतो..
आम्ही गावाबाहेर शेतात राहतो. रस्त्याचा काही वाद नाही. त्यांनी माझ्या घरातूनच रस्ता काढला आहे. बोलायला गेलो, तर वाळीत टाकले आहे. याबाबत पोलिसांकडे एक महिन्यापासून तक्रार दाखल करण्यासाठी चकरा मारत आहे, परंतु दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता मानवी हक्क आयोग व पोलिसांना पोस्टद्वारे तक्रार पाठविली आहे.
- दीपक म्हातारजी सुरडकर, पीडित.
हा तर गंभीर गुन्हा...
असा प्रकार जर झाला असेल, तर हा गंभीर गुन्हा आहे. याबाबत पोलीस निरीक्षक यांच्याशी तत्काळ चर्चा करून कार्यवाही करण्यास सांगतो व जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई होईल.
- विक्रम राजपूत, तहसीलदार, सिल्लोड.