धक्कादायक ! बलात्कारानंतर तरुणीला विकण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:08 PM2018-10-04T13:08:53+5:302018-10-04T13:11:44+5:30
काम मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेला जालना येथे नेऊन एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पाच लाखांत विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला
औरंगाबाद : काम मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेला जालना येथे नेऊन एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पाच लाखांत विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेऊन पीडितेने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. ही खळबळजनक घटना २८ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर दरम्यान जालना येथील एका लॉजवर घडली.
गणेश बालाजी आर्दड (३०, रा. जालना) आणि एका महिलेचा आरोपीमध्ये समावेश आहे. २३ वर्षीय पीडितेचे पतीसोबत पटत नसल्याने ती अडीच वर्षीय चिमुकलीसह राजनगर येथे माहेरी राहते. मुकुंदवाडी येथील रहिवासी आरोपी महिलेसोबत तिची ओळख झाली. तुला काम मिळवून देते, असे ती सतत सांगायची. २८ रोजी सकाळी १० वाजता तिने पीडितेला तिच्या घरी बोलावले. पीडिता चिमुकलीसह आरोपी महिलेच्या घरी जात असताना रस्त्यातच तिचा मित्र आर्दड भेटला. त्यानंतर ते सर्व जण जालना येथे गेले.
जालना बसस्थानकावर पीडितेला गणेशच्या हवाली करून ती महिला औरंगाबादला परतली. पीडिता आणि तिच्या मुलीला गणेश लॉजवर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध करताच त्याने मुलीला आणि तिला मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर दोनदा अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीने त्याच्या अन्य एका मैत्रिणीला जालना बसस्थानकावर बोलावले. देऊळगावराजा जवळच्या एका गावात राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीच्या गावी पीडितेला पाठविले. दोन दिवस तेथे राहिल्यानंतर १ आॅक्टोबरला ते जालना येथे परतले.
तेथे आरोपी महिला आणि गणेश आर्दड उपस्थित होते. तेथे आरोपीने पीडितेचे मोबाईल छायाचित्र काढून कोणाला तरी फोन केला. त्यावेळी तिची पाच लाखांत विक्री करण्याची आरोपींमधील चर्चा तिने ऐकली. तेव्हा औरंगाबादेतील माहेरी मुलीला सोडून येते असा बहाणा तिने केला. ती १ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांत तक्रार नोंदविली.
पीडितेला बेंगलोरला पाठविण्याची होती तयारी
तुझ्यासाठी बेंगलोर येथे चांगले काम आहे, तेथे तुला आठ दिवस राहावे लागेल, असे आरोपीने पीडितेला सांगितले. मात्र या कामात तुझी मुलगी आडकाठी ठरत असल्याने तिला कोणाकडे तरी ठेवावे लागेल असे तो म्हणाला. आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी मुलीला आई-बाबांकडे ठेवून परत येते, असे खोटे सांगून पीडिता औरंगाबादेत परतली. रात्री आई-वडिलांना घटनेची माहिती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुन्हा नोंद केला.
आरोपीला पोलीस कोठडी
दरम्यान, आरोपी गणेश बालाजी आर्दड याला बुधवारी (दि. ३ आॅक्टोबर) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.ए. राठोड यांनी ११ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.