धक्कादायक ! उपोषणकर्त्यांच्या अंगावर वाहन घालून चिरडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 07:03 PM2020-03-06T19:03:24+5:302020-03-06T19:03:43+5:30
याबाबतच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सिल्लोड: अंधारी येथील ग्रामस्थांचे विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत समोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू होते. बुधवारी रात्री २ वाजेच्या सुमारास एका जीपने त्यांना चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. याबाबतच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र मेवालाल वानखेडे यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दादाराव वानखेडे, लताबाई दादाराव वानखेडे, ज्ञानेश्वर तायडे, विजय नामदेव गोरे, शकील पटेल व इतर 15 ते 20 गावकरी विविध मागण्यांसाठी 4 मार्च पासून उपोषण करत होते. रात्री सर्व उपोषण करते झोपले होते. यावेळी उपोषणस्थळाकडे एक जीप भरधाव वेगात आली. रवींद्र वानखेडे यावेळी जागे असल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने उपोषणकरते जागे झाले यामुळे सर्वजण बचावले. यावरून सिल्लोड ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव नामदेव तायडे, श्याम भगवान सोनवणे, नवनाथ भगवान तायडे, अंकुश तुळशीराम तायडे, विठ्ठल भीमराव तायडे, विनोद बाबूलाल तायडे सर्व रा.अंधारी असे आरोपींची नावे आहेत.
काय होते प्रकरण
जातवाशिव ते लोणवाडीशिव भोर्डी नदीचे चौदावा वित्त आयोगातून झालेल्या खोलीकरणाच्या कामाचे मूल्यांकन करणे. राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत सण २०१३ मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून समितीचे अध्यक्ष व सर्व समिती सदस्य, गुत्तेदार व संबंधित शासकीय अधिकारी यांची चौकशी करून गुन्हा नोंदविण्यात यावा, अपूर्ण काम पूर्ण करून गावात पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. भ्रष्टाचार झालेला शासकीय निधी वसूल करण्यात यावा, विद्यमान सरपंच विजय नामदेव गोरे व सदस्य यांच्यावरील चौकशी समितीमधील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशा मागण्यांसाठी पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे, माजी सभापती लताबाई वानखेडे, मजूर फेडरेशन चे संचालक दादाराव वानखेडे, सरपंच विजय गोरे, ग्रामपंचायत सदस्य व इतर 15 ते 20 ग्रामस्थांनी उपोषण केले.
चौकशीचे आश्वासन दिल्याने सुटले उपोषण
गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास उपजिल्हाधिकारी डॉ.सुनील भोकरे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे,सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे यानी गुरुवारी रात्री उपोषणस्थळी भेट देऊन चौकशी करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर गुरुवारी रात्री उपोषण सोडण्यात आले.