धक्कादायक ! घरासमोर उभी केलेली वडिलांची दुचाकी मुलानेच चोरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 08:00 PM2021-01-04T20:00:55+5:302021-01-04T20:03:44+5:30
गुन्हे शाखेने कारवाईकरून मोटारसायकल चोर पकडला
औरंगाबाद : घरासमोर उभी केलेली दुचाकी चक्क मुलानेच लांबविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरून पोलिसांनी दुचाकीचोर मुलाला अटक केली. सौरभ प्रवीण मुंडे (२३, रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर) असे त्याचे नाव आहे.
प्रवीण निवृत्ती मुंडे (५०, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) यांची दुचाकी २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी १ जानेवारी रोजी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना मुंडे यांचा मुलगा सौरभकडे दुचाकीबाबत विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला.
त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच सौरभने तोंड उघडत चोरलेली दुचाकी जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधील मित्राकडे ठेवल्याची कबुली दिली. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार सुरेश जिरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त मीना मकवाना, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक विठ्ठल चासकर, पवन इंगळे, नजीर पठाण, सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, सुनील बेलकर, प्रभात म्हस्के, विजय पिंपळे, रवी खरात, नितीन धुळे, नितीन देशमुख व संदीप बिडकर यांनी केली.