आश्रमाच्या बाहेर पडताच १५ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, नदीत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 11:52 AM2024-06-26T11:52:24+5:302024-06-26T11:52:47+5:30

कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील घटना, बिबट्याच्या हल्ल्यात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

Shocking! Boy who went to ashram for satsang dies in leopard attack, incident in Kannada taluka | आश्रमाच्या बाहेर पडताच १५ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, नदीत आढळला मृतदेह

आश्रमाच्या बाहेर पडताच १५ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, नदीत आढळला मृतदेह

कन्नड : बिबट्याच्या हल्ल्यात एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील भांबरवाडी येथे मंगळवारी रात्री उघडकीस आली. ऋषिकेश विलास राठोड मृत मुलाचे नाव आहे. त्याच्या मृतदेहावर बिबट्याच्या हल्ल्याचे व्रण असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. सत्संगासाठी रात्री आश्रमात गेलेल्या ऋषिकेश लघुशंकेसाठी बाहेर पडला असता त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा अंदाज आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, मंगळवारी, दिनांक २५ जून रोजी ऋषिकेश हा आई वडिलांसोबत गावा जवळील आनंद महाराज यांच्या आश्रमात सत्संगसाठी गेला होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास ऋषिकेश लघुशंकेच्या निमित्ताने आश्रमाच्या बाहेर आला. मात्र, सत्संग संपला तरी तो दिसून आला नाही. आईवडिलांनी शोधाशोध चालू केली तरी तो आढळून आला नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी रात्रभर शोध घेतला मात्र यश आले नाही.

अखेर आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आश्रमापासून पाचशे मीटर लांब असलेल्या शंभर फूट खोल नदीत रक्ताने माखलेला ऋषिकेशचा मृतदेह आढळून आला.  त्याच्या संपूर्ण अंगावर बिबट्याच्या हल्ल्याचे ओरखडे आढळून आले. या परिस्थितीत नातेवाईकांनी  त्याला कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी सुहास कुलकर्णी  यांनी त्याला तपासून मृत घोषित करून शवविच्छेदन केले. 

घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी डॉ. रामचंद्र पवार, वन विभागाची कर्मचारी यांनी पंचनामा करून घटनेची नोंद केली. तसेच वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्यातच मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. ऋषिकेशच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ दोन बहिणी, काका, काकू असा परिवार आहे. कमी वयातच धार्मिक प्रवृत्तीचा ऋषिकेश नेहमी सत्संगसाठी आश्रमात जात असे. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. अभ्यासातही तो हुशार होता. घटनेची माहिती मिळताच साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक धैर्यशील केरे, शिक्षक राकेश निकम, रवींद्र जाधव, शिवराज पाटील, वैभव कतारे यांनी नातेवाईकांचे रुग्णालयात येऊन सांत्वन केले.

Web Title: Shocking! Boy who went to ashram for satsang dies in leopard attack, incident in Kannada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.