धक्कादायक! मानलेल्या भावाच्या मित्रांचा महिलेवर सामूहिक बलात्कार
By राम शिनगारे | Published: April 8, 2024 01:06 PM2024-04-08T13:06:47+5:302024-04-08T13:09:02+5:30
अत्याचारानंतर पीडितेची लूट; एमआयडीसी सिडको पोलिसांनी मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या
छत्रपती संभाजीनगर : मानलेल्या बहिणीला दोन हजार रुपये देण्यासाठी पाठविलेल्या मित्रानेच इतर दोन सहकाऱ्यांसह आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी (दि.५) रात्री ९ वाजेच्या सुमारास केंब्रिज परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आवघ्या पाच तासांत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या. उर्वरित दोन आरोपी फरार असून, त्याच्या शोधात पथके पाठविण्यात आल्याची माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.
पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य आरोपीचे एकनाथ नामदेव केदारे (२५, रा. आडगाव) असे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार त्या पती व दोन मुलांसह राहतात. ५ एप्रिल रोजी केस सुरू असल्यामुळे दुपारपासून पतीसह कोर्टातच होत्या. सायंकाळी ६ वाजता घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मानलेल्या भावाला फोन करून २ हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा त्याने माझा मित्र एकनाथला २ हजार रुपये घेऊन तुझ्याकडे पाठवितो, असे त्याने सांगितले. पीडितेच्या पतीला उपवास असल्यामुळे दोघे जण दुचाकीवर खरेदीसाठी किराणा दुकानात आले. तेव्हा पीडितेला मुख्य आरोपी एकनाथने फोन करून २ हजार रुपये देण्यासाठी पिसादेवी चौकात थोड्या वेळेत पोहोचत असल्याचे सांगितले.
एकनाथ पिसादेवी चौकात आल्यानंतर त्याने केम्ब्रिज चौकाजवळ एक माणूस थांबला असून, त्याच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला देतो, तुम्ही माझ्यासोबत चला, असे पीडितेला सांगितले. त्यानुसार पीडिता एकनाथच्या दुचाकीवर बसून केम्ब्रिज चौकाच्या परिसरात पोहोचली. एकनाथने सूर्या हॉटेलसमोर दुचाकी थांबवली. त्याठिकाणी आणखी दोघे जण होते. तिघांनी मिळून पीडितेला जवळच्या मोठ्या झाडांमध्ये ओढत नेले. त्याठिकाणी रुमालाने पाय बांधून तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. आरडाओरड करू नये म्हणून तोंड दाबून ठेवले. अत्याचार केल्यानंतर तिघांनी पीडितेच्या गळ्यातील मंगळसूत्र, मोबाइल, असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमालही लुटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या एकाने पिसादेवी चौकात सोडले
पीडितेवर अत्याचार केल्यानंतर तिघेही निघून गेले. पीडिता रडतच रस्त्यावर आल्यानंतर नागरिकांनी विचारपूस केली. मात्र, कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. पीडिता चालत एका कारखान्याजवळ आली. तेथे थोडावेळ थांबल्यानंतर एका दुचाकीवाल्यास मदत मागितल्यानंतर त्याने पिसादेवी चौकात आणून सोडले. तेथून पीडिता घरी पोहोचली. पतीला घटनाक्रम सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठाण्यात गुन्हा नोंदवला. अधिक तपास सहायक निरीक्षक मनीषा हिवराळे करीत आहेत.
गुन्हे शाखा घटनेविषयी अनभिज्ञ
एका महिलेवर सामूहिक अत्याचाराची भयंकर घटना घडल्यानंतर आरोपींना शोधण्यासाठी तत्पर गुन्हे शाखेची टीम फिरकलीच नसल्याची माहिती समोर आली आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनीच पाच तासांमध्ये मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मात्र, इतर कोणत्याही किरकोळ गुन्ह्यांचा समांतर तपास करणारी गुन्हे शाखा सामूहिक अत्याचाराच्या घटनेची माहिती घेण्यासाठी सुद्धा आली नसल्याची चर्चा पोलिसांमध्ये करण्यात येत आहे.