धक्कादायक ! औरंगाबादमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडून कोरोना लसीचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 03:03 PM2021-08-09T15:03:09+5:302021-08-09T15:03:33+5:30
Corona vaccine : या ठिकाणाहून वापरलेले १० इंजेक्शन आढळून आले आहेत.
औरंगाबाद : वाळूजमहानगरात आरोग्य विभागाचा कर्मचारीच लसीचा काळाबाजार करीत असल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.९) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास साजापूरात उघडकीस आली. गणेश दुरोळे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून लसीचा साठा जप्त केला आहे. प्रत्येकी ३०० रुपये घेऊन कामगारांना एका खोलीत बोलावून तो लस देत असल्याची माहिती आहे. (Corona vaccine black market exposed in Aurangabad)
औरंगाबादमध्ये कोरोना लसीचा सातत्याने तुटवडा आहे. अशा परिस्थितीत लसीचा हा काळाबाजार पुढे आला आहे. औरंगाबाद ग्रामीण भागातील एका लसीकरण केंद्रातील लस बाहेर आणत ती लस वाळूजपासून दूर साजापूर भागातील एका खाजगी जागेत कामगारांना देण्यात येत होती, याची माहिती रांजणगाव शेणपुंजी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते निखील कोळेकर यांना मिळाली. त्यांनी या प्रकरणाची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना व प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना दिली.
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी उपनिरीक्षक राहुल निर्वळ, पोहेकॉ. वाघ, पोहेकॉ. योगेश नाईक व पंच यांना साजापूरकडे रवाना केले. लसीकरण सुरु असतांना पोलिस पथकाने छापा मारुन दुरोळे यास ताब्यात घेतले. लस देणारा आरोग्यसेवक हा जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आहे. या ठिकाणाहून वापरलेले १० इंजेक्शन आढळून आले आहेत. आधार कार्ड आधी मागवून घेऊन त्याची नोंदणी करून पैसे घेऊन नागरिकांना लस देण्यात येत होती. दुरोळे यास लस उपलब्ध करुन देणारा दुसरा आरोग्य सेवक सय्यद अमजद यालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.