धक्कादायक ! औरंगाबादेत १४ वर्षीय मुलीचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 01:52 PM2020-08-15T13:52:28+5:302020-08-15T13:56:40+5:30
हर्सूल येथील १४ वर्षीय मुलगी उपचारासाठी ७ ऑगस्ट रोजी घाटीत दाखल झाली होती.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना १४ वर्षीय कोरोनाबाधित मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
हर्सूल येथील १४ वर्षीय मुलगी उपचारासाठी ७ ऑगस्ट रोजी घाटीत दाखल झाली. याच दिवशी तिचा तपासणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. गेल्या ७ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. दुर्दैवाने कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी झाली आणि शनिवारी (दि.१५) सकाळी ६ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, या मुलीसह घाटीत उपचार सुरू असताना एन-९, सिडको येथील २८ वर्षीय महिलेचा आणि संभाजी कॉलनी, सिडको येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला, अशी माहिती घाटी प्रशासनाने दिली. जिल्हात आतापर्यंत कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ही ५७९ झाली आहे.
शनिवारी १५१ बाधितांची वाढ
जिल्ह्यात शनिवारी सकाळी १५१ नव्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १८ हजार ४१० एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ४७४ रूग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५७९ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ४३५७ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.