धक्कादायक ! कोरोना योद्धा वैद्यकीय अधिकाऱ्यास सरपंचाकडून दवाखान्यात कोंडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 02:45 PM2021-04-02T14:45:01+5:302021-04-02T14:45:23+5:30
Corona warrior medical officer beaten by sarpanch याप्रकरणी डॉ. राठोड यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सरपंच दिलावर बेग, कृष्णा दांडगे, कैलास दांडगे, शेखर दांडगे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करमाड : औरंगाबाद तालुक्यातील वरुड काजी येथील आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी आनंद रामजी राठोड ( रा. N-4 औरंगाबाद )यांना वरुड येथील आरोग्य केंद्रात कोंडून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. एकीकडे आरोग्य विभागावर कोरोनामुळे प्रचंड ताण पडलेला असूनही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल सर्वत्र कृतज्ञता व्यक्त होत असताना असा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना प्रादुर्भावात जीवाची परवा न करता काम करणाऱ्या डॉक्टरला सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ. आनंद राठोड हे आरोग्य केंद्रात सतत गैरहजर राहतात असा आरोप करत कोंडून मारहाण केली आहे. दि. ३१ मार्च रोजी बुधवारी सकाळी १० च्या सुमारास हा प्रकार घडला. डॉ. राठोड हे बुधवारी लसीकरणात व्यस्त होते. त्याचवेळी त्यांना कैलास दांडगे यांनी फोन करून तुम्ही कोठे आहेत अशी चौकशी केली. राठोड यांनी मी आरोग्य केंद्रात आहे असं सांगून फोन कट केला. काही वेळाने सरपंच हे आपल्या तीन साथीदारांना घेऊन आरोग्य केंद्रात आले. आरोग्य केंद्राचे दार आतून बंद करून वैदयकीय अधिकारी राठोड यांना शिवीगाळ करून चापट बुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी डॉ. राठोड यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सरपंच दिलावर बेग, कृष्णा दांडगे, कैलास दांडगे, शेखर दांडगे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाले असून चिकलठाणा पोलिसांच्यावतीने त्यांचा कसून तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी प्रदीप ठुबे व त्यांचे सहकारी करत आहेत. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा लेखी इशारा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने दिला आहे.