धक्कादायक ! अपेक्षित गुण न मिळाल्याने नैराश्य; तरुणीने भावाला राखी बांधल्यानंतर केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 04:34 PM2020-08-05T16:34:20+5:302020-08-05T16:36:08+5:30
टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविल्याने तिच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे.
वाळूज महानगर : बारावी परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून नेहा अकोलकर हिने सोमवारी तीसगावच्या डोंगरावरून उडी मारत आत्महत्या केली होती. क्षुल्लक कारणावरून नेहा हिने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविल्याने तिच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे.
अशोक अकोलकर (रा. तेलवाडी, ता. कन्नड) हे ८ वर्षांपूर्वी पत्नी, तीन मुली व एक मुलगा यांना सोबत घेऊन वाळूज एमआयडीसी येथे रोजगाराच्या शोधात आले होते. उद्योगनगरीतील एका कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करीत अशोक अकोलकर वडगावातील साईनगरात वास्तव्यास होते. अभ्यासात हुशार असलेल्या नेहाला दहावीला ७५ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे उच्च पदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून नेहा हिने कन्नडच्या शिवछत्रपती महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेतला होता. काही दिवसांपूर्वी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात नेहाला ६१.६९ टक्के गुण मिळाले होते. आई-वडिलांनी तिची समजूत काढत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कमी गुण मिळाल्यामुळे ती एकाकी राहत होती.
सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नेहाने लहान भाऊ राज याला ओवाळून त्याच्याशी व कुटुंबाशी गप्पा मारल्या. यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास मी मैत्रिणीला भेटून येते, असे सांगून ती घराबाहेर पडली. सायंकाळ झाली तरी नेहा घरी न परतल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा परिसरात शोध सुरू केला असता त्यांना नेहा हिने तीसगावच्या खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे कुटुंबाला पोलिसांकडून समजले. बारावी परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे नैराश्यातून नेहाने आत्महत्या केल्याचा अंदाज हिचे वडील अशोक अकोलकर, मामा योगेश शिंदे यांनी वर्तविला आहे. मंगळवारी नेहा हिच्यावर सिडको वाळूज महानगरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
हलाखीची परिस्थिती
अशोक अकोलकर हे हलाखीची परिस्थिती असतानाही नेहाचे सर्व लाड पुरवीत. तिला उच्चशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहाने आत्महत्या केल्यामुळे अकोलकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. भीमराव शेवगे करीत आहेत.