धक्कादायक ! अपत्य होत नसल्याने दाम्पत्यात वाद; नैराश्यातून दोघांनीही केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:37 PM2020-09-11T12:37:26+5:302020-09-11T14:37:14+5:30
दोघे पती, पत्नी आपल्या छोट्या संसारात बाळाच्या आगमनाची प्रतिक्षा करू लागले; पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नव्हते़ बाळ होत नसल्याने पती, पत्नीत वाद झाला.
मुक्रमाबाद (जि़ नांदेड) : लग्नानंतर सुखी संसाराला सुरुवात झाली खरी, मात्र त्यानंतर मुल होत नसल्याने पती, पत्नीत वाद निर्माण झाले. त्यातच कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये पतीचे काम बंद झाले़ त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकून गावी परतलेल्या पती, पत्नीतील वाद विकोपाला गेला़ अखेर जगण्यावरचे प्रेम नाकारून दोघांनीही गळफास घेऊन मृत्यूला जवळ केले़ ही घटना मुखेड तालुक्यातील देगाव येथे मंगळवारी घडली़
मुक्रमाबाद पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या देगाव येथे लक्ष्मण विठ्ठल पुल्लेवाड (२५), अनुसया लक्ष्मण पुल्लेवाड (२४ ) यांचे तीन वर्षापूर्वी थाटामाटात लग्न झाले. गावाकडे काम नसल्याने नवदाम्पत्याने पोटासाठी मुंबईची वाट धरली़ मुंबईत हाताला मिळेल ते काम करून लक्ष्मण व अनुसया दोघेही सुखाने राहू लागले़ दोघे पती, पत्नी आपल्या छोट्या संसारात बाळाच्या आगमनाची प्रतिक्षा करू लागले; पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नव्हते़ बाळ होत नसल्याने पती, पत्नीत वाद झाला. प्रेमाच्या भरतीला ओहोटी लागली.
वादामुळे उचलले टोकाचे पाऊल
बाळ होण्यासाठी पती, पत्नी दवाखान्याच्या पायऱ्या चढू लागले़ मात्र, अनेक ठिकाणी उपचार करूनही यश येत नव्हते़ त्यामुळे बाळाचे स्वप्न पूर्ण होईल का नाही, अशी भीती दोघांनाही वाटू लागली़ त्यातच कोरोना महामारीचे संकट उभे राहिले़ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली़ मुंबईतील अनेकांचा रोजगार बंद झाला़ हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ सुरू झाली़ लक्ष्मण पुल्लेवाड यांच्या हाताचे कामही निघून गेले़ त्यामुळे मुखेड तालुक्यातील आपल्या मूळ गावी देगावला हे दोघेही परतले़ गावात काही दिवस राहिल्यानंतर परत त्यांच्यात विविध कारणावरून वाद होऊ लागले़ आपल्याला मूल होत नाही. आपले वादविवाद आयुष्यभर असेच चालू राहणार, यामुळे आयुष्य संपवलेलेच बरे होईल. असे ठरवून दोघांनीही मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शेतात असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़