धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात आज तिघांनी संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 07:09 PM2023-10-26T19:09:57+5:302023-10-26T19:10:31+5:30
हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या घटना घडल्या.
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता समाजातील तरूण टोकाची पाऊले उचलू लागली आहेत. आत्महत्या करू नका,असे आवाहन मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजबांधवांना केले आहे, यानंतरही आज मराठवाड्यात तिघांनी जीवन संपवल्याच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या घटना घडल्या.
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आंदोलन करीत आहेत. जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी(जि. जालना) येथील गत महिन्यात उपोषण सोडताना आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ४० दिवसांचा वेळ मागवून घेतला होता. यादरम्यान छत्रपती संभाजीनगरातील राजनगर येथील रहिवासी सुनील कावळे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर कोणीही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे राज्यसरकारने आरक्षणाचा प्रश्न न सोडविल्यामुळे त्यांनी २५ ऑक्टोबरपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण आणि नेत्यांना गावबंदी करत जरांगे यांना पाठिंबा सुरू आहे. यातच आज मराठवाड्यात तिघांनी आरक्षणासाठी युवक टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. या घटनांमुळे मराठा समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मराठवाड्यात आज मराठा युवकाच्या आत्महत्येची पहिली घटना हिंगोली जिल्हयातून पुढे आली. आखाडा बाळापूर तालुक्यातील २५ वर्षीय तरुण नाव कृष्णा उर्फ लहू यशवंतराव कल्याणकर याने आज सकाळी एकरा वाजेच्या सुमारास देवजना शिवारात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. कृष्णा शेतमजूरी आणि ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असे.
तर दुसरी घटना जालना जिल्ह्यात घडली. मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या भावनेने व्यथित होऊन घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील शिवाजी अण्णाकिसन माने (45) याने टोकाचे पाऊल उचलले. आज सकाळी साडेअकरा वाजता राहत्या घरामध्ये गळफास घेऊन माने याने आत्महत्या केली.
दरम्यान, आजची तिसरी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली.जरांगे यांच्या आंदोलनात सक्रीय सहभागी असलेल्या गणेश काकासाहेब कुबेर (२८) या तरुणाने आज दुपारी मराठा आरक्षण मागणीसाठी राहत्या घरात गळफास घेऊन मृत्यूला कवटळाले.आत्महत्येपूर्वी त्याने एका बोर्डवर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही,तोपर्यंत माझा मृतदेह जाळू नका,असे लिहून ठेवल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील कोटकर, सचीन हावळे पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आपगाव गाव गाठले. सुनील कावळे यांच्यानंतर जिल्ह्यात दुसरी आत्महत्या तालुक्यातील आपतगाव येथे घडली.