धक्कादायक ! वडील व सावत्र आईने अल्पवयीन मुलीची तीन वेळा केली विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 12:17 PM2021-08-28T12:17:30+5:302021-08-28T12:18:54+5:30
Rape on Minor Girl in Aurangabad : या प्रकरणात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वाळूज महानगर : वडील व सावत्र आईने नातेवाइकांच्या मदतीने अल्पवयीन मुलीची गुजरात व अन्य दोन ठिकाणी विक्री केल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात प्राप्त झाली असून, लैंगिक अत्याचारानंतर या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करून पुन्हा लग्न लावले होते. याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Shocking! The father and stepmother sold the minor girl three times)
वाळूज एमआयडीसी परिसरात वडील व सावत्र आईसोबत पीडित अल्पवयीन मुलगी राहत होती. तीन वर्षांपूर्वी तिचे वडील, सावत्र आई, मावशी व काका यांनी संगनमत करून गुजरात राज्यात एका महिलेकडून २ लाख रुपये घेऊन या अल्पवयीन मुलीस विकले. गुजरातमध्ये विक्री केलेल्या महिलेच्या घरी दोघांनी पीडितेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. पीडितेची प्रकृती खालावल्याने तिच्या वडिलांनी तिला गुजरात येथून औरंगाबादला आणले. पीडिता घरी आल्यानंतर तिचे वडील व सावत्र आईने तिला मानसिक त्रास देऊन छळ केला. काही दिवसांनंतर या दोघांनी तिला नंदुरबार येथे एका इसमास विकले. त्या इसमाने पीडितेवर दोन महिने वेळोवेळी अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. पीडितेची प्रकृती खालावल्यामुळे खरेदी करणाऱ्या इसमाने तिला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.
गर्भपात करून पीडितेचे लग्न लावून दिले
पीडित अल्पवयीन मुलीला वाळूज एमआयडीसीत परत आणल्यानंतर वडील व सावत्र आईने तिला बळजबरीने गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केला. काही दिवस उलटल्यानंतर आई-वडील व नातेवाइकांनी सातारा येथील एका इसमाकडून पैसे घेऊन त्याच्यासोबत पीडितेचे बळजबरीने लग्न लावून दिले. दरम्यान, सातारा येथे पतीने तिच्यावर सतत ८ ते ९ महिने अत्याचार केला. पतीकडून होणारा अत्याचार व मानसिक छळ असह्य झाल्यामुळे तिने मावशीसोबत संपर्क साधून मला घेऊन जा; अन्यथा मी आत्महत्या करेन, अशी धमकी दिली होती. मात्र, आई-वडील व नातेवाईक मदतीसाठी येत नसल्याने पीडितेने त्यांच्याविरोधात दहीवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
विक्री व अत्याचारप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा
नातेवाइकांविरुद्ध दिलेल्या तक्रारीनंतर पीडितेच्या काकाने तक्रार मागे घेण्यासाठी तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे पीडिता बहिणीसोबत मुंबईला निघून गेली. त्यानंतर पीडितेने नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलीस ठाण्यात आपली विक्री करणारे नातेवाईक, तसेच अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून हदगाव पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील घटना वाळूज एमआयडीसी हद्दीत घडल्याने हा गुन्हा हदगाव पोलिसांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एम.आर. घुनावत हे पुढील तपास करीत आहेत.