धक्कादायक ! ३० वर्षांत चार हजार मातृभाषा संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 02:21 PM2020-01-11T14:21:02+5:302020-01-11T14:27:19+5:30
सध्या जणू भाषा नष्ट करण्याची लाट आलेली आहे
औरंगाबाद : ‘जगात सुमारे सहा हजार मातृभाषा आहेत. त्यापैकी येत्या ३० वर्षांत चार हजार भाषा मरतील, संपुष्टात येतील. उरलेल्या दोन हजारपैकी सतराशे भाषा हात-पाय तोडलेल्या अवस्थेत राहतील व जेमतेम तीनशे भाषा शिल्लक राहण्याची शक्यता आहे’ असा धोका आज येथे विवेकानंद व्याख्यानमालेत प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला.
विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘भारतीय भाषांचे भवितव्य’ या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी, पाहुण्यांच्या हस्ते विवेकानंद व कै. पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मंचावर विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कोषाध्यक्ष तुषार शिसोदे व सहसचिव डॉ.यशोद पाटील यांची उपस्थिती होती. प्राचार्य श्याम शिरसाट यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा देवी, संदेश भंडारे, न्या. नरेंद्र चपळगावकर व प्राचार्य प्रताप बोराडे यांचे यावेळी दादाराव शेंगुळे, डॉ. अशोक गायकवाड, प्रभाकर मोरे, शुभांगी गोडबोले यांनी स्वागत केले. प्रा. मेघा गोरे यांनी सूत्रसंचालन केले व आभारही मानले.
डॉ. देवी म्हणाले की,भाषा वैविध्य जगवावंच लागेल. मातृभाषा वाचवणं, बोलणं, जपणं, त्यातील स्मृती पुढे नेणे, करुणामय सरकारे निर्माण करणे, हाच मार्ग होय व हेच आपले कर्तव्य होय. मी पृथ्वीचा पुत्र आहे. पृथ्वी माझ्या मालकीची नाही. स्मृती परंपरांना योग्य ते स्थान देऊन पृथ्वीवरच स्वर्ग कसा निर्माण करता येईल, हे बघणे महत्त्वाचे होय. विस्मृतीत चाललेले हे जग, स्मृतीवर अत्याचार करणारे हुकूमशाही पद्धतीची सरकारे याबद्दल देवी यांनी चिंता व्यक्त केली. आज संपूर्ण जग स्मृतिहीन होत आहे. कृत्रिम स्मृती वाढवून स्वत:ची स्मृती, शक्ती कमी केली जात आहे. जणू काळाबरोबर आपण वैर पत्करलंय. जगभर घाई झाली आहे. ऊर्जा, गती मिळवणं म्हणजे प्रगती होय, असे मानले जात आहे, असे ते म्हणाले.
जनगणना यंत्रणेमुळे भाषांचा लोप
डॉ. देवी यांनी भाषांचा लोप जनगणना यंत्रणेमुळे होत आहे, असे स्पष्ट केले. २०११ च्या जनगणनेत ३६०० मातृभाषांची नावे पुढे आली. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधील ५ कोटी २० लाख जनता भोजपुरी बोलते. परंतु सेन्ससने भोजपुरी ही हिंदीची पोटभाषा दाखविली. एकूण ६१ भाषा हिंदीत मिसळून या भाषांचं अस्तित्व सेन्ससनं नष्ट केलं. भाषा टिकवून ठेवण्यापेक्षा मारून टाकायला लोक आतुर झालेले आहेत. सध्या जणू भाषा नष्ट करण्याची लाट आलेली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.