धक्कादायक ! वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून विष घेतलेल्या ग्रामसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
By सुमेध उघडे | Published: January 21, 2021 11:34 AM2021-01-21T11:34:42+5:302021-01-21T12:33:09+5:30
सोमवारी मतमोजणी प्रक्रियेच्या दिवशी निवडणूक कामात असताना शिंदे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा वरिष्ठांनी लावला होता.
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय हरिभाऊ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी नऊच्या विष प्राशन केले होते. त्यांचा गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांचा ओरियन सिटी केअर हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. वरिष्ठ अधिकारीऱ्यांच्या जाचाला कंटाळुन शिंदे यांनी जीवन संपवल्याचा आरोप नातेवाईकांसह ग्रामसेवक संघटनेने केला आहे. या प्रकरणावरून ग्रामसेवक संघटनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. संघटनेने आजपासून जिल्हाभरात कामबंद आंदोलन पुकारले आहे.
सोमवारी मतमोजणी प्रक्रियेच्या दिवशी निवडणूक कामात असताना शिंदे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा वरिष्ठांनी लावला होता. पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांनी दि १८ रोजी बीडकीन ग्रामपंचायतीची अचानक तपासणी केली. लोंढे यांच्या जाचाला कंटाळून मंगळवारी बिडकीन येथील मारुती मंदिर परिसरात शिंदे यांनी विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना शहरातील ओरियन सिटी केअर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
ग्रामसेवक संघटना आक्रमक
विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बीडकीन येथील ग्रामसेवक शिंदे प्रकरणात गटविकास अधिकारी विजय लोंढे यांची चौकशी करून पैठण पंचायत समितीचा पदभार काढून घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने जिल्हा परिषद प्रशासनाकडे बुधवारी केली होती. गटविकास अधिकारी यांच्याकडील पदभार काढून न घेतल्यास जिल्हाभर २१ पासून कामबंद आंदोलन करण्याचा ईशारा ग्रामसेवक युनियनने दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात ग्रामसेवकांनी कामबंद केले आहे. असे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भीमराज दाणे यांनी सांगितले. तर शवविच्छेदना नंतर बिडकीन पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामसेवकांनी केली आहे.
गटविकास अधिकाऱ्याची सीआयडी माफत चौकशी करा
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पैठण येथील गटविकास अधिकारी विजय लोंढे यांनी १४ व्या वित्त आयोगाचे बँकेतून पैसे काढण्याचे ग्रामसेवकाचे अधिकार गोठवले आहेत. ग्रामसेवकांना १४ वा वित्त आयोगाच्या कामाचे बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय पैसे देण्यात येऊ नये असे आदेश बँकांना दिले आहेत . बँकेतून पैसे काढण्यासाठी आदेश मिळवताना प्रत्येक वेळी ग्रामसेवकांना पैसा मोजावा लागतो. १५ व्या वित्त आयोगाच्या आराखडयाला मंजुरी देण्यासाठी अडवणूक केली जाते. जे ग्रामसेवक मनाप्रमाणे वागत नाही त्यांना तपासणीकरून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. गटविकास अधिकारी ग्रामसेवकाकडून दरमहा वेतनातून पैसे मागणी करतात पैशाची मागणी पूर्ण न केल्यास वेतन बंद करण्यात येते . काही ग्रामसेवकांनी आर्थिक मागणी पूर्ण न केल्यामुळे त्यांच्या ग्रामपंचायतीचे अभिलेखे जप्त करुन नेले आहेत. गटविकास अधिकाऱ्याच्या दहशतीखाली तानतनावात सर्व ग्रामसेवक काम करीत आहेत. गटविकास अधिकारी लोंढे पैठण पंचायत समितीला राहील्यास अजून अशा घटना घडतील त्यामुळे सदर गटविकास अधिकारी विजय लोंढे यांचा पदभार काढून सी.आय.डी. मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामसेवक संघटनेने बुधवारी केली होती.