धक्कादायक ! अकरावी उत्तीर्ण शेकडो विद्यार्थ्यांचे बारावीसाठी गावाकडे चला अभियान

By राम शिनगारे | Published: June 25, 2024 07:58 PM2024-06-25T19:58:12+5:302024-06-25T20:01:30+5:30

बारावी ग्रामीण भागात करण्याचा इरादा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची शिक्षण उपसंचालकांकडे धाव

Shocking! Hundreds of 11th passed students campaign Chalo village for 12th Class | धक्कादायक ! अकरावी उत्तीर्ण शेकडो विद्यार्थ्यांचे बारावीसाठी गावाकडे चला अभियान

धक्कादायक ! अकरावी उत्तीर्ण शेकडो विद्यार्थ्यांचे बारावीसाठी गावाकडे चला अभियान

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये प्रवेश न घेताच टीसी काढण्यासाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागांमध्ये बारावीसाठी प्रवेश घ्यायचा असल्यामुळे अर्ज केल्याचा दावा कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासकांनी केला आहे.

अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी शहरातील विद्यार्थ्यांची ग्रामीण भागांमध्ये झुंबड उडाली आहे. या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात प्रवेश घेतल्यानंतर एकदाही वर्गात जाण्याची गरज नसते. त्याशिवाय पैकीच्या पैकी घरबसल्या प्रात्याक्षिकांचे मार्क मिळतात. परीक्षेच्या काळात मुक्त हस्ते कॉपी करण्यास मिळते. त्याउलट परिस्थिती शहरातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असते. विद्यार्थ्यांना वर्गात यावे लागते. प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागते. त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळत नाहीत. शहरातील परीक्षा केंद्रांवर कॉपी करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवेशासाठी विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. त्याठिकाणी प्रवेश घेऊन शहरांमध्ये विविध क्लासेसला अभ्यास करतात. मात्र, त्याचा परिणाम शहरातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये होत आहे. त्यामुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील, सचिव प्रा. गणेश शिंदे, देवगिरीचे उपप्राचार्य प्रा. सुरेश लिपाने, प्रा. नंदकिशोर गायकवाड, स.भु. विज्ञानचे प्रा. संजय गायकवाड, विवेकानंदचे प्रा. प्रदीप पाटील, मौलाना आझादचे प्रा. रशीद खान, छत्रपती महाविद्यालयाचे प्रा. भरत वहाटुळे, वसंतराव नाईकचे प्रा. एस.बी चव्हाण, डॉ. भारत खैरनार आणि भारत साेनवणे यांनी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांची भेट घेऊन ११ वी उत्तीर्णतेचे टीसी मागणाऱ्या विद्यार्थ्यांना पायबंद घालण्याची मागणी केली आहे.

७० शिक्षक झाले अतिरिक्त
जिल्ह्यात अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ९५ एवढी आहे. त्यातील ४० कनिष्ठ महाविद्यालये छत्रपती संभाजीनगर शहरात आहेत. या महाविद्यालयात ६५० शिक्षक कार्यरत होते. त्यापैकी मागील वर्षी विद्यार्थी संख्या घटल्यामुळे ७० शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यात एकट्या स. भू. कनिष्ठ महाविद्यालयातील २० शिक्षकांचा समावेश आहे.

२५० पेक्षा अधिक स्वयंअर्थसहाय्यीत कनिष्ठ महाविद्यालये
जिल्ह्यात २५० पेक्षा अधिक स्वयं अर्थसहाय्यीत उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यात १५० शहरांत आहेत. या महाविद्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. शिक्षकांच्या नेमणुका केलेल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांची प्रचंड तूट असल्याचे वारंवार समोर येत आहे.

अकरावी उत्तीर्णतेच्या टीसीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज
महाविद्यालय..........................अर्जांची संख्या

देवगिरी.....................................५००
विवेकानंद..................................२००
स.भू.विज्ञान................................१००
मौलाना आझाद...........................१५०
मिलिंद विज्ञान...............................७०
छत्रपती कॉलेज ........................................१५०
वसंतराव नाईक............................ ८०
डॉ.आंबेडकर वाणिज्य....................४०
मिलिंद कला..................................७०

क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास कारवाई
ग्रामीण भागामध्ये असलेल्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय मंडळाच्या पातळीवर परीक्षेसाठी तालुका पातळीवरीलच केंद्र देण्याविषयी विचार सुरू आहे तसेच महाविद्यालयांनी विनाकारण अकरावीचा टीसी मागणाऱ्यांना टीसी देऊ नये.
- अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक

Web Title: Shocking! Hundreds of 11th passed students campaign Chalo village for 12th Class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.