धक्कादायक! बनावट शिक्क्यांच्या आधारे खरेदी खत तयार करून देणारे रॅकेट सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 06:36 PM2024-07-26T18:36:32+5:302024-07-26T18:38:12+5:30
गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयातील गैरप्रकार; दोन महिने उलटूनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?
- संतोष उगले
वाळूज महानगर : औद्योगिक वाळूज परिसराला लागून असणाऱ्या ‘महत्त्वाच्या’ ग्रामपंचायत हद्दीतील तलाठी कार्यालय व मंडळ अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के तयार करून, त्या आधारे गावठाण प्रमाणपत्र बनवून ‘खरेदी खत तयार करणारे रॅकेट’ गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयात मागील काही महिन्यांपासून सक्रिय आहे. काही अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला खरा; मात्र गुन्हे दाखल करण्याबाबत अर्थपूर्ण मौन पाळले जात आहे. या प्रकारामुळे या लॅन्ड माफियांच्या टोळीला कर्मचारी, अधिकाऱ्यांसह काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचाही वरदहस्त असावा, अशी जोरदार चर्चा गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयासह औद्योगिक परिसरात सुरू आहे.
औद्योगिक परिसरातील वाळूज, रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, विटावा आदींसह गंगापूर तालुक्यातील इतर गावांतील सात-बारा गटातील क्षेत्राचे बनावट सही, शिक्क्यांच्या आधारे ‘गावठाण प्रमाणपत्र’ तयार केले जात आहे. त्या आधारे गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयातून खरेदी खत दस्त तयार करून देणारी टोळी सक्रिय झाली आहे. सदरील प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्या-त्या तलाठी, मंडळ अधिकारी यांनी लेखी स्वरूपात गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालय, पोलिस आयुक्त कार्यालयाकडे शिवाय वरिष्ठांकडे ‘खरेदीखत दस्तामध्ये बनावट शिक्के मारून गावठाण प्रमाणपत्र जोडणाऱ्या व्यक्तींविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केलेली आहे. परंतु दोन महिने उलटूनही या गंभीर प्रकरणी अद्याप गुन्हे दाखल करण्यात आलेले नसल्याची माहिती संबंधितांनी दिली.
पाच गावांतील १४ बोगस नोंदी उघडकीस
रांजणगाव शेणपुंजी - ३
जोगेश्वरी - ५
घाणेगाव - ३
वाळूज -१
विटावा -२
प्रकरण पहिले----
रांजणगाव शेणपुंजी येथील मिळकत क्र. ८३९० ही जागा गावठाण हद्दीत येत नाही, पण अशोक चांगदेव थोरात यांनी खोट्या सही व शिक्क्याच्या आधारे खोटे गावठाण प्रमाणपत्र तयार करून खरेदी दस्त क्र. २५५२/ २०२४ दुय्यम निबंधक गंगापूर येथील कार्यालयात २५ एप्रिल २०२४ रोजी खरेदी खत तयार केले आहे.
प्रकरण दुसरे---
कुंडलिक मच्छिंद्र गवळी यांनीसुद्धा रांजणगाव शेणपुंजी येथील गावठाण हद्दीत नसणारे क्षेत्र खोटे सही शिक्याच्या आधारे गावठाण प्रमाणपत्र तयार करून घेतले. पुढे त्याआधारे गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्र. ४६४/२०२४ नुसार खरेदी खात तयार केल्याचे आढळून आले आहे.
प्रकरण तिसरे---
महेश राम वाघ व मंगेश राम वाघ यांनी मौजे वाळूज येथील मिळत क्र.१३०८/२ चे खरेदी दस्त २६०७/२०२४ ला लावलेले गावठाण प्रमाणपत्र हे खोटे असून त्यावरील सह्या व शिक्के खोटे असल्याने सदरील खरेदी दस्त रद्द करून संबंधितांवर शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे लेखी पत्र दुय्यम निबंधक कार्यालय, गंगापूर यांना ९ मे २०२४ रोजी संबंधित तलाठी यांनी दिले आहे.
पडताळणी करून कारवाई
दुय्यम निबंधक कार्यालयाकडे लेखी स्वरूपात गुन्हा दाखल करून कारवाई करणेबाबत कळवण्यात आलेले आहे. पडताळणी करून वरिष्ठ पुढील कारवाई करतील.
- सतीश सोनी, तहसीलदार, गंगापूर
लेखी स्वरूपात प्रशासनाकडे तक्रार
संबंधित रॅकेटकडून बनावट शिक्क्यांचा वापर करून अनेक खरेदीखत दस्त तयार केल्याची शंका आल्याने, संबंधितावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी याकरिता लेखी स्वरूपात प्रशासनाकडे तक्रार दिलेली आहे. शिवाय दुय्यम निबंधक कार्यालय गंगापूर यांच्यासह त्या-त्या ग्राम विकास अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे.
- सीएफ माळी, तलाठी रांजणगाव
- अशोक पळसकर, तलाठी, वाळूज