धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरात बॉम्बे मार्केटच्या औषधींचा व्यवसाय दरवर्षी ३०० कोटींपर्यंत

By मुजीब देवणीकर | Published: December 11, 2024 07:43 PM2024-12-11T19:43:56+5:302024-12-11T19:46:45+5:30

रुग्णांच्या जिवाशी खेळ: कोणाचा विश्वास बसणार नाही, असे मोठमोठे डॉक्टरही या व्यवसायाला पाठबळ देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

Shocking! In Chhatrapati Sambhajinagar the business of Bombay market medicines is up to 300 crores per annum | धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरात बॉम्बे मार्केटच्या औषधींचा व्यवसाय दरवर्षी ३०० कोटींपर्यंत

धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरात बॉम्बे मार्केटच्या औषधींचा व्यवसाय दरवर्षी ३०० कोटींपर्यंत

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय क्षेत्रात बॉम्बे मार्केटच्या (बीएम) औषधींचा व्यवसाय झपाट्याने वाढतोय. काही वर्षांपूर्वी शहरात मोजक्याच तीन दुकानांमध्ये सी ग्रेडची औषधी विक्रीला उपलब्ध होती. आता शहरातील तब्बल १०० पेक्षा अधिक काऊंटरवर धूमधडाक्यात सुरू आहे. बीएम मार्केटचा व्यवसाय दरवर्षी ३०० कोटींपर्यंत पोहोचला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कोणाचा विश्वास बसणार नाही, असे मोठमोठे डॉक्टरही या व्यवसायाला पाठबळ देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

वैद्यकीय क्षेत्रात अनेक दशकांपासून काम करणाऱ्या मंडळींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बाजारात तीन प्रकारच्या औषधी उपलब्ध आहेत. याची वर्गवारी ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ अशी करता येईल. ‘ए’ या प्रकारात देशातील, जगभरातील नावाजलेल्या कंपन्या औषधींची निर्मिती आणि विक्री करतात. त्यासाठी संशोधन, औषधींची निर्मिती, पॅकिंगची गुणवत्ता सर्वच बाबींवर बारीक लक्ष दिले जाते. ‘बी’ प्रवर्गात जेनेरिक औषधींसाठीही तेवढेच प्रयत्न होतात. ‘सी’ या प्रवर्गात सर्वांत मोठा घोळ आहे. प्रत्येक औषध अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगीनेच विक्रीला बाजारात येते. सी प्रकारात औषधीसाठी वापरलेले मटेरियल निकृष्ट दर्जाचे, पॅकेजिंगकडे लक्ष नाही, काही दिवसांतच औषधींचा भुसा होतो. हे औषध घेतल्यानंतर रुग्णाला कोणताही फायदा होत नाही, उलट नुकसानच होते.

८० टक्के डिस्काऊंट
सी ग्रेडची औषधी विकण्याची स्पर्धा झपाट्याने वाढू लागली. काही औषधी विक्रेते ८० टक्यांपर्यंत डिस्काऊंट देत आहेत. मुळात ‘बीएम’ औषधी तयार करताना खर्च नाममात्र असतो. त्यावर पाहिजे तसे लेबल, एमआरपी टाकून विकले जाते. शहरातील काही डॉक्टर या उद्योगाला खतपाणी घालत असल्याचे समोर आले आहे.

हॉस्पिटल आणि काउंटर
शहरातील काही डॉक्टर आणि तेथील मेडिकल शॉपचालकाला या बोगस औषधी कंपन्यांनी हाताशी धरले आहे. डॉक्टरच्या सांगण्यावरून स्वत:चे नाव टाकूनही औषधीचे ब्रँड तयार करून देण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. डॉक्टरने लिहून दिलेली औषधी विशिष्ट दुकानाशिवाय दुसरीकडे कुठेही मिळत नाही. याचा अर्थ असा की, संबंधित औषधी १०० टक्के बॉम्बे मार्केटची असणार आहे.

गुगलवर औषधीचे नावच येत नाही
एखाद्या औषधीचे गुगलवर नावच येत नसेल तर ९९ टक्के औषधी बोगस असावी, असे गृहीत धरावे. नामांकित कंपन्या आपल्या उत्पादनावर क्यूआर कोड, बारकोड देतात. ते स्कॅन केले तर औषधीचा संपूर्ण तपशील आपोआप प्राप्त होतो. बॉम्बे मार्केटच्या औषधींवर असे काहीच नसते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

एफडीएकडून तपासणी का नाही?
अन्न व औषध प्रशासनाकडून अधूनमधून विविध दुकानांवरील औषधींचे सॅम्पल जमा केले जातात. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्याचा अहवाल आल्यावर शासनाकडून त्या औषधींच्या विक्रीवर निर्बंध घातले जातात. अलीकडेच शासनाने ६०० कंपन्यांवर बंदी घातली. एफडीएचे कर्मचारी एखाद्या दुकानात गेले तरी पाच ते दहा सॅम्पल जमा करतात. दुकानात किमान एक हजार कंपन्यांचे प्रॉडक्ट् ठेवलेले असतात. त्यातील बोगस तपासणी करणे शक्य नसते. जप्त केलेले सॅम्पल कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून प्रयोगशाळेत पाठवावे लागते. एवढ्या सुविधा एफडीएकडे नाहीत, असेही जाणकारांनी सांगितले.

Web Title: Shocking! In Chhatrapati Sambhajinagar the business of Bombay market medicines is up to 300 crores per annum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.