धक्कादायक ! घाटी रुग्णालयातील पाणी पिण्यास अयोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 04:56 PM2019-04-08T16:56:02+5:302019-04-08T17:00:31+5:30
प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीतून आले समोर
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील १५ ठिकाणांपैकी केवळ ४ ठिकाणचे पाणी पिण्यास व वापरण्यास योग्य असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल ११ ठिकाणी पाणी अयोग्य असल्याचे आढळले. छावणीतील विभागीय प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीतून ही बाब पुढे आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) एकूण १५ ठिकाणच्या पाण्याचे नमुने मार्चमध्ये मायक्रोबायोलॉजिकल विश्लेषणासाठी छावणीतील विभागीय प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. या १५ ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल घाटी रुग्णालयास प्राप्त झाला. अहवालात १४ पैकी केवळ ४ ठिकाणचे पाणी पिण्यास आणि वापरण्यास योग्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यात मुलींचे वसतिगृह, ग्रंथालय, रुग्णालय पाकशाळा, नर्सिंग हॉस्टेल या चार ठिकाणचे पाणी पिण्यास व वापरण्यास योग्य असल्यावर प्रयोगशाळेने शिक्कामोर्तब केले आहे. इतर ११ ठिकाणचे पाणी पिण्यास व वापरण्यास अयोग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणच्या पाण्याचा वापर तात्काळ थांबविण्यात आला. पाणी पिण्यासाठी व वापरण्यासाठी निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निर्जंतुकीकरणानंतर आणि त्यासंदर्भात विभागीय प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या ११ ठिकणचे पाणी पिण्यासाठी वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. महापालिकेकडून घाटीला पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी प्रत्येक विभागांना टाक्यांद्वारे पुरविले जाते. हे पाणी पिण्यासाठी नव्हे तर केवळ स्वच्छतागृह इतर कामांसाठी वापरले जात असल्याचेही प्रशासनाचे म्हणणे आहे.
पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ
घाटी रुग्णालयात आजघडीला घोटभर थंड पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांवर येत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना बाटली घेऊन थेट रुग्णालयाच्या बाहेरचा रस्ता धरावा लागत आहे. पाणी कुठे मिळते, याची विचारणा करीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरण्याची वेळ ओढावते आहे.
निर्जंतुकीकरण प्रक्रिया
प्रशासनाने संबंधित पाणी नमुने तपासणीसाठी दिले होते. संबंधित ठिकाणच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. टाक्या साफ के ल्या जात आहेत. पाण्यात आता ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत आहे.
-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)