खळबळजनक! वाळूजमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:04 PM2022-12-21T12:04:24+5:302022-12-21T12:05:00+5:30
दोन्ही घटनेतील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे
वाळूज महानगर (औरंगाबाद) : पाणी पिण्याचा बहाणा करून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन अत्याचार केल्याची तक्रार मंगळवारी एमआयडीसी वाळूज ठाण्यात देण्यात आली. रमेश येडूबा मोरे (३०, रा. वाळूज परिसर) यास पोलिसांनी जेरबंद केले. सोमवारी देखील उद्योगनगरीतील अल्पवयीन मुलीस दुचाकीवरून पळवून नेऊन खुलताबादला एका हॉटेलात अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. यातील आरोपी शिव चौधरी (२१, रा. वाळूज परिसर) हा देखील पोलिसांच्या ताब्यात आहे.
पहिल्या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पूजा (नाव बदलले आहे) या मुलीची आई, आजी व भावंडे शेजाऱ्यांकडे हळदीचा कार्यक्रम असल्याने शनिवारी सायंकाळी जेवणासाठी गेले होते. आई व आजीला कार्यक्रमात पूजा न दिसल्याने त्या दोघी पूजाला शोधू लागल्या. काही वेळाने ती अंधारातून पळत येताना दिसली. तिचे कपडे फाटलेले होते. आई व आजीने पूजाला धीर देत चौकशी केली. पूजाने सांगितले की, रमेश मोरे हा रात्री पाणी पिण्यासाठी घरात आला होता. त्याने तिला घरामागील शेतात ओढून नेऊन अत्याचार केला. नंतर या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पूजाने आरोपीच्या ताब्यातून पळ काढला. घाबरलेल्या तिच्या आई व आजीने बदनामीच्या भीतीने वाच्यता केली नव्हती. मात्र, तिच्या आईने मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल करून रमेश मोरे यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले. तो विवाहित आहे. तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वाती उचित करीत आहेत.
खुलताबादला हॉटेलात कुकर्म करणारा मित्र जेरबंद
पीडिता अंजली (१७, नाव बदलले आहे) खासगी शाळेत इयत्ता दहावीत शिकते. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ती शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ जाताच तिचा मित्र शिव चौधरी हा दुचाकीवर थांबलेला दिसला. चौधरीने अंजलीस दुचाकीवर फिरण्यास जाऊ, असा आग्रह धरला. मात्र अंजलीने शाळा सुरू आहे. शिवाय यापूर्वीही फिरण्याचा बहाणा करून घाणेरडे प्रकार केल्याचे सांगत सोबत येण्यास नकार दिला. पण चौधरी तिला बळजबरीने दुचाकीवर घेऊन खुलताबादला गेला. खुलताबादला एका हॉटेलच्या रूममध्ये चौधरीने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास तिला दुचाकीवर उद्योगनगरीत सोडून पसार झाला.
पूर्वीही केले अत्याचार
अंजली घाबरलेल्या अवस्थेत घरी गेली. तोपर्यंत तिचे पालक व मामांना ती शाळेत गेली नसल्याचे समजले होते. तिने घटना सांगितली. यापूर्वीही तीन ते चार वेळेस चौधरीने अत्याचार केल्याचे सांगितले. यानंतर पालकांनी तिला सोबत घेऊन एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गौतम वावळे यांनी वाळूज परिसरात शोधमोहीम राबवून सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास चौधरीस उचलले. अंजलीला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. निरीक्षक गौतम वावळे करीत आहेत.