धक्कादायक ! भारतात मिळते तिसऱ्या आणि चौथ्या दर्जाचे केशर; नामांकित ब्रँडमध्ये सुद्धा भेसळ उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:28 PM2018-11-13T12:28:39+5:302018-11-13T12:36:46+5:30
महागडा पदार्थ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या केशरमध्ये सर्वाधिक भेसळ करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार संशोधनातून उघडकीस आला आहे.
- राम शिनगारे
औरंगाबाद : महागडा पदार्थ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या केशरमध्ये सर्वाधिक भेसळ करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार संशोधनातून उघडकीस आला आहे. केशरच्या नामांकित ब्रँडमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे मायक्रोस्कोपी, स्पेक्ट्रोस्कोपी आणि डीएनए बारकोडिंग तंत्राद्वारे केलेल्या एकत्रित चाचणीत स्पष्ट झाले आहे. भारतात मिळणारे केशर हे तिसऱ्या, चौथ्या दर्जाचे आहे. हे संशोधन ‘फूड केमिस्ट्री’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
रंग, स्वाद आणि औषधी गुणधर्मामुळे केशराला जगभर प्रचंड मागणी आहे. केशराची विक्री ग्रॅममध्ये होते. देशात एकूण २५ क्ंिवटल केशराचे उत्पादन जम्मू-काश्मीरमध्ये होते; मात्र देशभरात विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात केशर विक्री करण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक डॉ. विक्रम खिलारे, डीएनए बारकोडिंगचे संचालक डॉ. गुलाब खेडकर, संशोधिका अनिता टिकनायक आणि कर्नाटकातील मंगळूर येथील भारती प्रकाश यांनी केशराच्या भेसळीवरील संशोधन प्रकल्प हाती घेतला. यासाठी देशातील १७ राज्यांतून केशराची विक्री करणाऱ्या विविध ६३ ब्रँडचे सॅम्पल मिळवले.
प्रत्येक ब्रँडची मायक्रोस्कोपी, स्पेक्ट्रोस्कोपी आणि डीएनए बारकोडिंग तंत्राद्वारे एकत्रित चाचणी घेतली. या चाचणीमध्ये ५० टक्के उत्पादन पूर्णपणे बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यात २६ टक्के उत्पादन हे चौथ्या दर्जाचे आणि २२ टक्के उत्पादन तिसऱ्या दर्जाचे असल्याचेही चाचण्यांत समोर आले.
२ टक्के केशरामध्ये केशराची पाने, पाकळ्या असल्याचेही दिसून आले. भारतात जम्मू-काश्मीरमध्येही प्रथम दर्जाचे केशर मिळत नसल्याचा दावा या संशोधनाद्वारे केला आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘फूड केमिस्ट्री’ या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून, त्याचा आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट फॅक्टर ४.९४ इतका असल्याची माहिती संशोधक डॉ. विक्रम खिलारे यांनी दिली.
याची केली जाते भेसळ :
५० टक्के बोगस असलेल्या केशरामध्ये गव्हाच्या ओंब्यांचे तुरे, रानटी गवताच्या काड्या, मक्याचे तुरे, झाडूच्या झाडाचे तुरे, तुतीच्या फुलाच्या पाकळ्या, पिश्त्याच्या फुलाच्या पाकळ्यांना केशराचा कलर आणि स्वाद दिला जात असल्याचे डॉ. खिलारे यांनी सांगितले.
‘एफएसएसएआय’ची अनेक ब्रँडला परवानगी
केंद्र सरकारने विविध पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी निर्माण केलेल्या ‘फूड सेफ्टी अॅण्ड स्टँडर्ड अॅथॉरिटी आॅफ इंडिया’ (एफएसएसएआय) या संस्थेचा लोगो आणि परवानगी अनेक ब्रँडच्या उत्पादनावर छापण्यात आलेली आहे. ही उत्पादनेही बोगस असल्याचे संशोधनात दिसून आले.
अशी मिळाली संशोधनाला प्रेरणा
औरंगाबाद शहरातील एका प्रसिद्ध नागिलीच्या पानाच्या दुकानात केशरयुक्त पान होते. ओळखीच्या त्या पान मालकाला केशराची एक काडी पाहण्यासाठी मागितली असता, त्याने १० ते १५ काड्या दिल्या. त्या काड्या परतही घेतल्या नाहीत. एवढा महाग पदार्थ असा कसा काय सहजपणे दिला जाऊ शकतो. यात नक्कीच काहीतरी गडबड असावी, म्हणून त्यावर संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. यातूनच देशभरातील विविध राज्यांतून संशोधनासाठी सॅम्पल खरेदी केले. त्यातून हे सत्य समोर आले. त्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृती मिळाल्याचे डॉ. गुलाब खेडकर यांनी सांगितले.