छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ज्युनिअर विद्यार्थ्याची ‘रॅगिंग’, ६ सिनिअर्सवर कारवाई 

By संतोष हिरेमठ | Published: June 14, 2024 07:32 PM2024-06-14T19:32:27+5:302024-06-14T19:33:23+5:30

तिघे सहा महिन्यांसाठी सस्पेंड, २५ हजारांचा दंड; अन्य तीन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी हाॅस्टेल, ग्रंथालयात प्रतिबंध, त्यांनाही २५ हजारांचा दंड

Shocking! Junior student's 'ragging' in Ghati Hospital of Chhatrapati Sambhajinagar, action taken against 6 seniors  | छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ज्युनिअर विद्यार्थ्याची ‘रॅगिंग’, ६ सिनिअर्सवर कारवाई 

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ज्युनिअर विद्यार्थ्याची ‘रॅगिंग’, ६ सिनिअर्सवर कारवाई 

छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) ज्युनिअर विद्यार्थ्याची सीनिअर्संकडून रॅगिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन सीनिअर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून ६ महिन्यांसाठी सस्पेंड करण्यात आले आहे. तसेच त्यांना हाॅस्टेलमध्ये कायमस्वरुपी प्रतिबंध करण्यात आला आहे आणि प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे, तर रॅगिंगच्या वेळी उपस्थित असलेल्या अन्य तीन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी हाॅस्टेल आणि ग्रंथालयात प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच त्यांनाही प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

घाटीतील द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्याने रुग्णालय प्रशासन आणि अँटी रॅगिंग कमिटीकडे यासंदर्भात तक्रार केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अँटी रॅगिंग कमिटीने तातडीने बैठक घेऊन विद्यार्थ्यांची तक्रारनुसार चौकशी केली. या चौकशीअंती रॅगिंग झाल्याचे स्पष्ट झाले. समितीच्या अहवालानंतर अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी याप्रकरणी नॅशनल मेडिकल काऊन्सिलच्या (एनएमसी) नियमानुसार कारवाई केली.

काय केले रॅगिंगमध्ये ?
तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील काही वर्षांना ७ जून रोजी रात्री ओल्ड बाॅईज हाॅस्टेलमध्ये बोलावले. यावेळी सीनिअर्सनी ज्युनिअर विद्यार्थ्यांसोबत असभ्य भाषेत संवाद साधला. सिगारेट आणून द्या, मद्य आणून द्या, असे म्हणत काॅलर धरण्याचाही प्रकार केला. यामुळे संबंधित ज्युनिअर विद्यार्थी भयभीत झाला होता. अशा अवस्थेत त्याने तक्रार केली. त्याची स्थिती पाहून वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांनी त्याला धीर दिला. या घटनेनंतर तो विद्यार्थी आई-वडिलांसोबत गेला.

अँटी रॅगिंग कमिटीने केलेल्या सूचना..
- सीनिअर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थांना बैठकीसाठी रात्री बोलवू नये.
- वसतिगृहात वार्डनने नियमितपणे राऊंड घ्यावे.
- वसतिगृहातच खानावळ असावी.

पुन्हा पुनरावृत्ती नको, म्हणून कडक कारवाई
भविष्यात रॅगिंगची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या (एनएमसी) नियमानुसार कडक कारवाई करण्यात आली आहे. त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा असा काही प्रकार केला तर त्यांचे प्रवेश रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्यक्ष बोलावून झालेली घटना व शिक्षा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली व भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असे कळविण्यात आले.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता

Web Title: Shocking! Junior student's 'ragging' in Ghati Hospital of Chhatrapati Sambhajinagar, action taken against 6 seniors 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.