धक्कादायक ! मागील ९ महिन्यांत १० अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले; २ बनल्या कुमारी माता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 01:53 PM2020-12-16T13:53:03+5:302020-12-16T14:03:34+5:30
एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत घरातून पळून गेलेल्या १० मुलींना पोलिसांनी पकडून बाल कल्याण समितीसमोर हजर केले आहे.
औरंगाबाद : अवघ्या १६ वर्षाची ती मुलगी. तिला वाटत होते की, आपल्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहे, तसाच आपल्यालाही असावा. राजकुमाराचे गुलाबी स्वप्न तिला पडू लागले. सोशल मीडियाद्वारे ती गावातील एका मुलाच्या प्रेमात पडली. याची कुणकुण घरच्यांना लागली, अन अचानक ती मुलगी घरातून गायब झाली. ही काही एखाद्या चित्रपटातील किंवा टीव्ही सिरीयलमधील कथा नसून मागील ९ महिन्यात जिल्ह्यात अशा प्रकारे १० अल्पवयीन मुली आभासी प्रेमाच्या जाळ्यात अडकल्या व त्यांना पळवून नेण्यात आले. त्यांचे अज्ञान व प्रेमाचा गैरफायदा घेत २ मुलींच्या भाळी कुमारी मातेचा शिक्का बसला.
समाजात घडणाऱ्या या वास्तवाची दाहकता बाल कल्याण समितीकडे येणाऱ्या प्रकरणाच्या आकडेवारीवरून दिसते आहे. एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत घरातून पळून गेलेल्या १० मुलींना पोलिसांनी पकडून बाल कल्याण समितीसमोर हजर केले आहे. तर २ जणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर अकाली मातृत्व लादले गेले. या १२ मुली अवघ्या १५ ते १७ वयोगटातील आहेत. पळून गेलेल्यांमध्ये ९ मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून फूस लावून नेल्याची माहिती समोर आली आहे. बाल कल्याण समितीने या मुलींना बाल संरक्षण गृहात ठेवले आहे. त्यातील ६ मुलींना त्यांच्या पालकांनी घरी नेले पण बाकीच्या मुलींना घरी नेण्यास त्यांचे आई- वडील पुढे आले नाहीत, असे बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड. मनोहर बनस्वाल यांनी सांगितले.
मुलगी सुधारली, तर घरी नेतो
आमची मुलगी सुधारली असेल तर आम्ही तिला घरी नेतो. मुलगी आमचे ऐकत नाही, आम्ही आमच्या जातीतील चांगल्या मुलासोबत तिचे लग्न लावून देऊ, तिला अनेक चांगले स्थळ येत होते, पण मुलगी त्या टुकार पोरासोबत घरातून पळून गेली. आम्ही कमावलेली इज्जत मातीत मिळविली, असे त्या मुलींच्या पालकांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
आई- वडिलांचा मुलांशी कमी झाला संवाद
ज्या घरात आई- वडिलांचा आपल्या मुलांशी किंवा मुलीशी संवाद तुटतो. पालक आपल्या पाल्याला वेळ देऊ शकत नाही. तेथे या अल्पवयीन मुली आपणास कोणी तरी प्रेमाने बोलावे यासाठी बॉयफ्रेंडचा शोध घेतात. यात काही मुली फसविल्या जातात. असे प्रकार घडू नयेत म्हणून आईने आपल्या मुलीशी मैत्रिणीसारखे वागावे. त्यांना वेळ द्यावा. तसेच आता मुलांना व मुलींना शाळेतच समुपदेशन करण्याची वेळ आली आहे.
- ॲड. ज्योती पत्की, अध्यक्ष, बाल कल्याण समिती