धक्कादायक ! ऊसतोडीस जाण्यास नकार दिल्याने मजूर महिलेचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 06:51 PM2021-09-06T18:51:47+5:302021-09-06T18:52:46+5:30

शहरातून व्याजाने पैसे काढून देतो, तुम्ही व्याज भरा, असे सांगून महिलेस मुकादमाने साथीदाराच्या मदतीने शहरात नेले.

Shocking! Kidnapping of a laboring woman for refusing to go to sugarcane cutting work | धक्कादायक ! ऊसतोडीस जाण्यास नकार दिल्याने मजूर महिलेचे अपहरण

धक्कादायक ! ऊसतोडीस जाण्यास नकार दिल्याने मजूर महिलेचे अपहरण

googlenewsNext
ठळक मुद्देउचल घेतलेल्या १ लाख १० हजारांसाठी मुकादमाने केले अपहरण

वाळूज महानगर : आजारी असल्याने ऊसतोडीस जाण्यास नकार देणाऱ्या ४२ वर्षीय ऊसतोड मजूर महिलेचे मुकादमाने अपहरण केल्याची खळबळजनक घटना रांजणगाव शेणपुंजीत घडली. या महिलेच्या शोधासाठी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पथक माजलगावला (जि. बीड) रवाना झाले आहे.

सतीश नामदेव घायतडक व त्यांची आई हिराबाई हे दोघे चार-पाच वर्षांपूर्वी साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी घायतडक कुटुंब रांजणगावात रोजगाराच्या शोधात आले. साखर कारखान्यात ऊसतोडीसाठी मजूर पाठविणारा मुकादम राजेंद्र टाकणखार (रा. माजलगाव, जि. बीड) हा दोन महिन्यांपूर्वी रांजणगावात घायतडक यांच्या घरी आला होता. मुकादमाने घायतडक यांच्याशी चर्चा करून येत्या गाळप हंगामात ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यावर जायचे असल्याचे सांगितले. सतीश व त्यांची आई हिराबाई यांनी मुकादम टाकणखार याच्याकडून उचल म्हणून १ लाख १० हजार रुपये घेतले होते. गत काही दिवसांपासून टाकणखारने सतीश यांच्याशी संपर्क साधून ऊसतोडीसाठी चालण्याचा तगादा लावला. मात्र, आईची तब्येत खराब असल्याने सतीशने जाण्यास नकार दिला.

दरम्यान, टाकणखार शुक्रवारी (दि.३) रात्री ८ वाजता दोन साथीदारासह रांजणगावात सतीशच्या घरी आला. शहरातून व्याजाने पैसे काढून देतो, तुम्ही व्याज भरा, असे सांगून रिक्षा बोलावून हिराबाईंना आपल्या साथीदाराच्या मदतीने शहरात घेऊन गेला. पैशांचे काम झाल्यानंतर मुकादम आईला परत घरी आणून सोडेल या आशेमुळे सतीशने तक्रार दिली नव्हती. रविवारी सतीशने आईशी संपर्क साधला असता मुकादमाने माजलगावात कुणाच्या तरी घरी ठेवल्याचे सांगितले. याप्रकरणी दीपाली घायतडक यांच्या फिर्यादीवरून मुकादम राजेंद्र टाकणखार व त्याच्या दोन अनोळखीच्या साथीदाराविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी उपनिरीक्षक अधाणे, सहा. उपनिरीक्षक कय्युम पठाण आदींचे पथक मंगळवारी सकाळी बीडला रवाना केले.

Web Title: Shocking! Kidnapping of a laboring woman for refusing to go to sugarcane cutting work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.