धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरात देशविरोधी कटासाठी बैठक, एटीएसची १४ जणांना नोटीस
By सुमित डोळे | Published: January 3, 2024 01:46 PM2024-01-03T13:46:19+5:302024-01-03T13:46:38+5:30
लखनौ एटीएस कार्यालयात १५ ते १८ जानेवारीदरम्यान हजर राहण्यास बजावले
छत्रपती संभाजीनगर : जानेवारी २०२४मध्ये होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात एका संघटनेची सप्टेंबर महिन्यात गुप्त बैठक झाली. यात सदर कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा पार पडली. या बैठकीचे तांत्रिक पुरावे प्राप्त झाल्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने ऑक्टोबरमध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर नुकतेच युपी एटीएस पथक शहरात तपासासाठी आले होते. त्यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या शहरातील १४ जणांना नोटीस बजावली आहे. त्यात १५ ते १८ जानेवारीदरम्यान लखनौमधील एटीएस मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
जानेवारी महिन्यात देशात पार पडणाऱ्या एका मोठ्या आयोजनाच्या अनुषंगाने काही ठिकाणी त्याविरोधी मोहीम सुरू झाली. काही संघटनांकडून त्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले. त्यापैकी एक बैठक शहरातही पार पडली. या बैठकीत जानेवारी २०२४ साठी विरोधी कट रचल्याचे काही तांत्रिक पुरावे तेलंगणा पोलिसांना मिळाले होते. अयोध्येमधील धार्मिक स्थळांबाबत उल्लेख बैठकीत झाल्याने तेलंगणा पोलिसांनी तत्काळ पुरावेच उत्तर प्रदेश एटीएसला पाठवले. या बैठकीला दहशतवादी संघटना इसिसचे समर्थनही करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
तपास यंत्रणांमधील सुत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश एटीएसने महाराष्ट्र एटीएसला यासंदर्भाने पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्याची दखलच घेतली गेली नाही. जानेवारी महिन्यातील मोठ्या आयोजनाचे गांभीर्य ओळखून अखेर उत्तर प्रदेश प्रशासनाने लखनौ येथील दहशतवादविरोधी पोलिस ठाण्यात भादंवि कलम १५३ ए, १५३ बी, भादंवि व १३/१८ बेकायदेशीर क्रिया (यूएपीए) अधिनियम १९६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तपास अधिकारी शहरात
या गुन्ह्याच्या तपासासाठी उत्तर प्रदेश एटीएसचे अधिकारी नुकतेच शहरात येऊन गेले. त्यांनी संशयितांची चौकशी करून नोटीस बजावली. ३० डिसेंबर रोजी एटीएसचे उपअधीक्षक कुलदीप तिवारी यांच्या स्वाक्षरीची हिंदी भाषेत नोटीस बजावली. मात्र, ती बजावण्यासाठी इतका उशीर का केला, इतके गंभीर आरोप असताना केवळ नोटीस का बजावली, असे प्रश्नही उपस्थित झाले आहेत.