धक्कादायक! आमदार सत्तारांची मुलगी TET परीक्षेत अपात्र, मात्र २०१७ पासून पगार होता सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 04:25 PM2022-08-08T16:25:39+5:302022-08-08T16:27:38+5:30
टीईटी घोटाळ्यात समाविष्ट उमेदवारांच्या नावांच्या यादीत माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे नाव असल्याची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.
- अमेय पाठक
औरंगाबाद: माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांचे नाव टीईटी घोटाळ्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावर खुलासा करण्याचा प्रयत्न सत्तार यांनी केला आहे मात्र अपात्र असूनही त्यांच्या मुलीने पगार उचल्याचे उघडकीस आले आहे. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख यांना २०१७ पासून आजतागायात पगार मिळत असल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आल्याने या प्रकरणाचा गुंता आता वाढत जात आहे.
हीना कौसर अब्दुल सत्तार शेख या टीईटी परीक्षेत अपात्र आहेत असा खुलासा स्वतः अब्दुल सत्तार यांनी केला आहे. असे असतानाही २०१७ पासून त्यांना पगार कसा काय सुरु होता ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. या संदर्भात आता एक वेगळी चौकशी करण्याची गरज आहे. कारण शिक्षण विभागांच्या कागदपत्रांनुसार २०१७ पासून ते जुलै २०२२ या महिन्यापर्यंत हिना कौसर अब्दुल सत्तार शेख यांनी पगार उचलला आहे. त्यांना महिना ४०००० पेक्षा जास्त पगार असल्याचीही माहिती आहे.
दरम्यान, टीईटी घोटाळ्यात समाविष्ट उमेदवारांच्या नावांच्या यादीत माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे नाव असल्याची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर खुद्द सत्तार यांनीच त्यांची मुलगी टीईटी अपात्र असल्याचं सुरुवातीला माध्यमांना सांगत त्याचे पत्र दिलं. यामुळे जर त्या अपात्र होत्या तर मग त्या पगार कुठल्या निकषावर उचलतात हाही प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे.
तर शाळेने वेतन बिल सादर केलं त्यात त्या पूर्णतः पात्र असल्याचं दिसतंय आणि म्हणून त्यांचा पगार सुरू असल्याचा खुलासा यावेळी शिक्षण विभागाने केला. शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पात्रता निकष पडताळणी केली जाते त्यानुसार आमच्या कार्यालयातून पगार पत्रक निघतात असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
२०१४ ला झाल्या रुजू
दरम्यान, शिक्षकांसाठी टीईटी २०१३ ला आवश्यक करण्यात आली. हीना कौशर अब्दुल सत्तार शेख या २०१४ मध्ये सिल्लोडमधील नॅशनल उर्दू प्राथमिक स्कुलमध्ये रुजू झाल्या. हीना कौशर यांना १-१०-२०१४ पासून तीन वर्षासाठी शिक्षण सेवक म्हणून प्रथम मान्यता मिळाली. शिक्षणाधिकारी कार्यालयाने १६-५-२०१५ ला मान्यता दिली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून पुन्हा तीन वर्षांसाठी ३१-१०-२०१७ ला मान्यता दिली. मात्र, ११-१-२०२२ ला शिक्षण विभागाने पुणे कार्यालयास पाठवलेल्या पत्रात यांचा समावेश करण्यात आला नाही.
अपात्र असतानाही पगार
हीना यांना २०१७ पासून ४० हजार पासून पगार सुरु झाला. अल्पसंख्याक शाळेला २०१८ ला टीईटी आवश्यक केली. त्यानंतर २०२० मध्ये झालेल्या टीईटीमध्ये हीना अपात्र ठरल्या आहेत. मात्र, जुलै २०२२ पर्यंत हीना यांनी पगार घेतला. सध्या त्यांना ५५ हजार रुपये पगार आहे, अशी माहिती वेतन अधीक्षक दिलीप जेऊळकर यांनी दिली.