धक्कादायक ! अनाथ मुलीचे १६ व्या वर्षांत दोन लग्न; त्यानंतर झाली सामूहिक अत्याचाराची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 01:13 PM2021-01-12T13:13:48+5:302021-01-12T13:16:40+5:30
Rape on Minor Girl : घर सोडून रेल्वेस्टेशन परिसरात झोपलेल्या पीडितेवर तीन नराधमांनी अत्याचार केले.
औरंगाबाद : आई-वडिलाचे बालपणातच छत्र हरपल्याने दत्तक आई-वडिलांनी तिचे अवघ्या १६व्या वर्षी तिचे राजस्थानातील तरुणासोबत लग्न लावले. मात्र, तेथेही तिचा छळ सुरू झाल्यानंतर ती शेजारच्या तरुणाच्या भावाच्या घरी मदतीने खासगी ट्रॅव्हल बसने औरंगाबादेत पोहोचली. त्यांच्याशी झालेल्या कुरबुरीनंतर घराबाहेर पडलेल्या पीडितेवर औरंगाबाद रेल्वेस्थानक परिसरात भेटलेल्या तरुणाने तिला स्वतःच्या घरी नेले आणि मंदिरात तिच्यासोबत लग्न केले. मात्र तोही मारहाण करू लागल्यामुळे त्याचे घर सोडून रेल्वेस्टेशन परिसरात झोपलेल्या पीडितेवर तीन नराधमांनी अत्याचार केले. या आभागी तरुणीवर अत्याचार करणारे कोण याचे कोडे पोलिसांना तीन दिवसांनंतरही उलगडता आले नाही.
वरिष्ठ सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार रिमा (काल्पनिक नाव ) उत्तर प्रदेशातील रहिवासी. ८ जानेवारी रोजी रात्री चिकलठाणा रेल्वेस्टेशन येथे ती एकटीच बसलेली असल्याचे पाहून सतर्क नागरिकाने पोलिसांना आणि चाइल्डलाइनला फोन करून तिच्याविषयी कळविले. पोलीस आणि चाइल्डलाइनच्या महिला कार्यकर्त्यांनी तिला विश्वासात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. नंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या जबाब महिला दक्षता समितीच्या पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांचा थरकाप उडविणारा होता. औरंगाबाद रेल्वेस्थानक येथे ५ रोजी एकटी असताना पोलिसांनी तिला तेथून बाहेर जाण्यास सांगितले. यामुळे ती स्थानकातून बाहेर पडली आणि काही अंतरावर झाडाच्या आडोशाला जाऊन झोपली. रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास ती लघुशंका करण्यासाठी तेथून काही अंतरावर गेली तेव्हा तीन नराधम तिच्यावर तुटून पडले. त्यांनी तिला तेथून उचलून अन्य ठिकाणी नेले आणि अत्याचार केल्याने ती बेशुद्ध झाली. ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या अंगावरील कपडे बाजूला पडलेले दिसले. तिने ते कपडे घातले. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांकडून संशयितांची चौकशी
रेल्वेस्थानक परिसर सतत गुन्हेगार आणि नशेखोरांचा अड्डा बनलेला असतो. रात्रपाळीचे रिक्षाचालक नशेत प्रवासी वाहतूक करतात. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. यामुळे तिच्यावर अत्याचार करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संशयितांची धरपकड आणि चौकशी सुरू केली. नराधमाची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हान आहे. पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ हे स्वतः या तपासांवर लक्ष ठेवून आहेत.