धक्कादायक ! कोरोना निदानात लॅबच्या शॉर्टकटमुळे रुग्णांचा जातोय जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 06:15 PM2020-09-18T18:15:10+5:302020-09-18T18:37:45+5:30
राज्यातील बहुतांश प्रयोगशाळा एनएबीएलच्या नियमानुसार अहवाल देत नसल्याची धक्कादायक माहिती डॉ. बाबासाहबे आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कोविड-१९ प्रयोगशाळेतील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद बजाज यांनी दिली.
- राम शिनगारे
औरंगाबाद : कोविड-१९ विषाणूच्या तपासणीसाठी आयसीएमआरकडून मान्यताप्राप्त राज्यातील बहुतांश शासकीय प्रयोगशाळा स्वॅब पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हाच अहवाल देतात. नॅशनल अॅक्रेडेशन बोर्ड आॅफ लॅबोरेटरीज (एनएबीएल)च्या नियमानुसार स्वॅबचे सायकल थ्रीसोल्ड (सीटी) मूल्य दिल्यास रुग्णांच्या चाचणीच्या वेळीच आजाराची तीव्रता स्पष्ट होते. त्यानुसार डॉक्टर उपचार करू शकतात; परंतु प्रयोगशाळांचा शॉर्टकट अहवाल रुग्णांच्या जिवावर बेतत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यातील बहुतांश प्रयोगशाळा एनएबीएलच्या नियमानुसार अहवाल देत नसल्याची धक्कादायक माहिती डॉ. बाबासाहबे आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कोविड-१९ प्रयोगशाळेतील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद बजाज यांनी दिली. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. एकट्या घाटी रुग्णालयात ८० टक्के रुग्ण हे स्टेज-४ व ५ या गंभीर अवस्थेत आहेत. या रुग्णांत विषाणू संचाराची तीव्रता निदानावेळीच समोर न येऊ शकल्याने त्यांना वेळेवर तीव्रतेनुसार उपचार मिळालेले नाहीत. ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. बजाज यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले की, आरटीपीसीआर चाचण्यांसाठी ४५ पर्यंत सायकल थ्रीसोल्ड (सीटी) व्हॅल्यू असते. मात्र, सर्वसाधारणपणे ४० ते ४५ दरम्यान सीटी तपासण्यात येत असतो. कोविड-१९ साठी ही मर्यादा कुठे ३६, ३२, ३३, अशी ठेवण्यात आलेली आहे. यात १६ सीटीपर्यंतचे अहवाल निगेटिव्ह असतात. त्यानंतर १६ ते २४ सीटीतील रुग्णाला बाधा झाल्याचे स्पष्ट होते. २४ ते ३० दरम्यानच्या रुग्ण सिव्हियर असतात. ३० पेक्षा अधिकचे रुग्ण हे डिक्लाईन स्थितीत पोहोचलेले असतात.
कोणत्याही परिस्थिती आजार लपविता कामा नये. https://t.co/f332n9bk0h
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 16, 2020
कोविडची तपासणी करणाऱ्या यंत्रातून याविषयीचा चार्ट तयार होत असतो. हा चार्ट संबंधित रुग्ण, डॉक्टरांपर्यंत पोहोचल्यास त्यानुसार उपचार होऊ शकतात. काळजी घेता येऊ शकते. मात्र, कोविड विषाणूच्या तपासणीसाठी बनविलेल्या कीट वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यात असलेल्या सायकलही पूर्ण क्षमतेने शासकीय यंत्रणांच्या लॅबकडून तपासण्यात येत नाहीत. केवळ पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एवढेच निदान झाल्याचे सांगण्यात येते, तसेच कमी सायकल तपासल्यामुळे कोरोनाबाधितांचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्ण पॉझिटिव्ह असूनही निगेटिव्ह येण्याची शक्यता असते, असेही डॉ. बजाज यांनी सांगितले. विद्यापीठातील प्रयोगशाळेत प्रत्येक स्वॅबचे सीटी चार्ट एनएबीएलच्या नियमानुसार तयार करण्यात येतात. त्यांची माहिती स्वॅब देणाऱ्या यंत्रणांना देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सिटीस्कॅन केल्यास कळते स्थिती
कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह व निगेटिव्ह सांगण्याच्या पद्धतीमुळे रुग्णाला इन्फेक्शन किती झाले, हे समजत नाही. त्यामुळे डॉक्टरही सर्वसाधारण उपचार करतात. रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यास सिटीस्कॅन केले जाते. त्यात कोरोना कुठपर्यंत पोहोचला ते समजते. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला असतो. हा धोका टाळण्यासाठी आरटीपीसीआर अहवालातच तीव्रता स्पष्ट केली पाहिजे, तरच मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
अँटिजन चाचणीतही आयसीएमआरची पायमल्ली
राज्य शासनासह देशभरात रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्यांमध्ये तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचा अवाहल पॉझिटिव्ह येतो. कमी लक्षणे असताना अहवाल निगेटिव्ह आल्यास संबंधित रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना आयसीएमआरने दिलेल्या आहेत. या सूचनांचेही सर्रासपणे उल्लंघन केले जाते. यातून कमी लक्षणे असलेल्या रुग्णांचा अहवाल काही दिवसांनी पॉझिटिव्ह येतो आणि त्यांची सिटी व्हॅल्यू अधिक वाढलेली असते, असेही त्यांनी सांगितले.
हिमोग्लोबिनचे प्रमाण अधिक कमी झाल्यास रुग्णास कृत्रिम ऑक्सिजनची गरजhttps://t.co/K7d8k2wtHa
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 18, 2020
७५ हजार क्यूसेक विसर्गाने गोदावरीला महापूर https://t.co/xF7JT4a3iB
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 18, 2020