धक्कादायक ! महापालिकेच्या लसीकरणात राजकारण; डॉक्टरांना कारणे दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 06:26 PM2021-08-26T18:26:46+5:302021-08-26T18:28:11+5:30
मागील तीन महिन्यांत आरोग्य विभागातील सत्ता केंद्रासाठी डॉ. पारस मंडलेचा आणि डॉ. नीता पाडळकर यांच्यात ओढाताण सुरू आहे.
औरंगाबाद : बजाज समूहाने सीएसआर अंतर्गत महापालिकेला कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली आहे. एन-११ येथील आरोग्य केंद्रात मंगळवारी आयोजित लस वितरण कार्यक्रमात राजकारण शिरले. शासनाकडून नियुक्त मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून कार्यक्रम उरकण्यात आला. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या लसीकरण माेहीम प्रमुख डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर आरोग्य वैद्यकीय अधिकारी-१, आरोग्य वैद्यकीय अधिकारी-२ अशी पदे निर्माण करण्यात आली. वास्तविक पाहता कायद्याने या पदांना अजिबात आधार नाही. फक्त प्रशासनाच्या आदेशावरून हे सर्व काही सुरू आहे. मागील तीन महिन्यांत आरोग्य विभागातील सत्ता केंद्रासाठी डॉ. पारस मंडलेचा आणि डॉ. नीता पाडळकर यांच्यात ओढाताण सुरू आहे. त्यातच मंगळवारी बजाज समूहाने दिलेल्या लसच्या वितरणाचा कार्यक्रम एन-११ येथे आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडलेचा यांना बोलाविण्यात आले नाही. कार्यक्रम होणार असल्याची कल्पनाही त्यांना देण्यात आली नाही. डॉ. पाडळकर यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास बजाज समूहाचे सल्लागार सी. पी. त्रिपाठी, डॉ. रवी सावरे, डॉ. प्रियांका भोजने, डॉ. तिवारी, पर्यवेक्षक गजभारे यांची उपस्थिती होती. सायंकाळी डॉ. मंडलेचा यांना कार्यक्रमाबद्दल माहिती मिळाली. त्यांनी आरोग्य केंद्राचे प्रमुख रवी सावरे, लसीकरण अधिकारी डॉ. नळगीरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.