धक्कादायक, ऑक्सिजन मास्क काढून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:02 AM2021-04-29T04:02:56+5:302021-04-29T04:02:56+5:30
१० टक्के रुग्णांची अवस्था : डेथ ऑडिट कमिटीचे निरीक्षण, उपचाराबरोबर रुग्णांवर लक्ष ठेवण्याची आरोग्य यंत्रणेवर वेळ औरंगाबाद : कोरोना ...
१० टक्के रुग्णांची अवस्था : डेथ ऑडिट कमिटीचे निरीक्षण, उपचाराबरोबर रुग्णांवर लक्ष ठेवण्याची आरोग्य यंत्रणेवर वेळ
औरंगाबाद : कोरोना रुग्णांना सध्या ऑक्सिजन खऱ्या अर्थाने प्राणवायू ठरत आहे. पण अनेक रुग्ण आपण चांगले आहोत, ऑक्सिजनची गरज नाही, असा समज करून स्वतःच ऑक्सिजन मास्क काढून टाकत आहेत. जवळपास १० टक्के रुग्ण असा प्रकार करतात. त्यामुळे असे रुग्ण एकप्रकारे मृत्यूलाच आमंत्रण दिले जात आहे. या प्रकारावर घाटीतील डेथ ऑडिट कमिटीची चर्चा करून या परिस्थितीवर अनेक उपाययोजना करून रुग्णांचा मास्क हटणार नाही, यासाठी प्रयत्न केला जात आहे.
कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत कमी झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे. पण गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. सध्या ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या आहे. अशा रुग्णांनी खाटा भरून गेल्या आहेत. उपचारादरम्यान रुग्णांना ऑक्सिजन लावले जाते. त्यामुळे रुग्णांची प्रकृती सुधारण्यास मदत होते. पण उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका यांना ऑक्सिजनवरील रुग्णांवर सतत लक्ष ठेवावे लागते आहे. कारण अनेक रुग्ण हा मास्क स्वतः काढून टाकत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकाराकडे जर थोडेही दुर्लक्ष झाले तर हा प्रकार रुग्णांच्या जीवावर बेतू शकतो.
---
ही आहेत मास्क काढण्याची कारणे
शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असली तरी रुग्ण सामान्य दिसत असतो. श्वास घेण्यास अडथळा होण्याची लक्षणे दिसून येत नाहीत. वैद्यकीय भाषेत डॉक्टर याला ''हॅप्पी हायपॉक्सिया'' असे म्हणतात. मास्क काढण्यामागे हे एक कारण आहे. मास्कशिवाय चांगले वाटते. पण काही वेळातच रुग्णाची प्रकृती गंभीर होते. आपल्याला काही झाले नाही, उगीच मास्क लावला, असा समज करून रुग्ण मास्क काढून टाकतात.
--
घाटीत सुरू केलेले उपाय
- रुग्णांना मास्क काढल्यावर होणारी ऑक्सिजन पातळी आणि मास्क लावल्यावर वाढणारी ऑक्सिजन पातळी दाखवली जाते.
- मस्कचे महत्त्व, मास्क नाही ठेवला तर संभाव्य धोका रुग्णाला सांगितला जातो.
- रुग्णांचे मानसोपचारतज्ज्ञ समुपदेशन करतात.
- नातेवाइकांना रुग्णांना फोन करण्यास सांगून मास्क काढू नका, असे सांगण्याचा सल्ला दिला जातो.
---
---
रुग्ण सहकार्य करीत नाही
उपचारादरम्यान अनेक रुग्ण सहकार्य करीत नाहीत. जवळपास १० टक्के रुग्ण वारंवार मास्क काढून टाकतात. त्यांना ऑक्सिजनची नितांत गरज असते. पण ते ऑक्सिजन मास्क ठेवत नाहीत.
- डॉ. अनिल जोशी, अध्यक्ष, डेथ ऑडिट कमिटी, घाटी
---
प्रत्येक रुग्णावर लक्ष
रुग्णांची संख्या वाढली आहे. पण तरीही प्रत्येक रुग्णावर लक्ष दिले जाते. मास्कचे महत्त्व रुग्णांना समजावून सांगितले जाते. नातेवाइकांची मदत घेतली जाते. मास्क काढून ठेवल्याने आतापर्यंत सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नाही.
- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन, घाटी
---
मास्क परत लावतो
मास्क लावल्यावर रुग्णांना गुदमरल्यासारखे वाटते आणि मास्क काढल्यावर बरे वाटले. हा एक प्रकारे हॅप्पी हायपोक्सियाच आहे. पण ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर रुग्णाला गंभीरता कळते. तेव्हा मास्क परत लावला जातो.
- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक