कपिल खून प्रकरणात धक्कादायक खुलासे; आरोपीच्या जबाबावरून राजकीय पदाधिकाऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 08:16 PM2024-07-30T20:16:45+5:302024-07-30T20:17:17+5:30
कोठडीत आरोपींनी रांजणगावातील एका राजकीय पदाधिकाऱ्याने कपिलचा खून करण्याचा कट रचल्याची कबुली दिली.
वाळूज महानगर : रांजणगाव येथील कपिल सुदाम पिंगळे या तरुणाच्या खूनप्रकरणी धक्कादायक खुलासे समोर येत असून, या प्रकरणाला राजकीय किनार असल्याचे उघडकीस आले आहे. रांजणगावच्या ‘त्या’ फरार राजकीय पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने आरोपींची संख्या ६ झाली आहे.
हॉटेल-लॉजिंग व्यावसायिक कपिल सुदाम पिंगळे (३१, रा. रांजणगाव) याचा गुरुवारी मध्यरात्री जयेश ऊर्फ यश संजय फत्तेलष्कर (२४, रा. बेगमपुरा) याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने खून केला. पोलिसांनी यश व त्याचे साथीदार भरत पंडुरे, विकास जाधव व सागर मुळे या चौघांना जालना येथे पकडले होते. कपिलने यशला ठार मारण्यासाठी अज्ञात व्यक्तीकडून ‘सुपारी’ घेतल्याचा संशय असल्याने यशने कपिलचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली होती.
कपिलचा खून करण्यासाठी यशने जालना येथील अमर ऊर्फ अतुल गणेश पवार याच्याकडून ५० हजारांत गावठी कट्टा विकत घेतला होता. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अमरच्याही मुसक्या बांधल्या होत्या. या ५ आरोपींना २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीत आरोपींनी रांजणगावातील एका राजकीय पदाधिकाऱ्याने कपिलचा खून करण्याचा कट रचल्याची कबुली दिली. खुनानंतर पसार झालेल्या त्या पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आरोपींची संख्या ६ झाली असून, पदाधिकाऱ्याच्या शोधासाठी पथके विविध ठिकाणी रवाना केल्याचे पाटील यांनी सांगितले.
वाढीव कोठडी; ॲट्राॅसिटीचा गुन्हा
५ आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या ५ आरोपींना वाढीव ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून आरोपींविरुद्ध ॲट्राॅसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी सांगितले.
वाळूज कपिल खून जोड-ठोंबरे, नंदवंशीचा शोध सुरू
या पाच आरोपींना एक ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी दिले. न्यायालयात सहायक लोकअभियोक्ता कैलास पवार यांनी युक्तिवाद केला. मुख्य आरोपी शिवराम हरिभाऊ ठोंबरे (रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शे. पुंं., ता. गंगापूर) आणि खून केल्यानंतर आरोपींना शेंद्रा एमआयडीसी परिसरातून कारने माजलगावमार्गे नांदेडला नेणारा आरोपी शिव नंदवंशी, असे दोघे अद्यापही फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.