धक्कादायक! स्तनदा मातांना दिलेल्या पोषण आहाराच्या पॉकेटमध्ये निघाला सडलेला उंदीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:20 PM2023-04-25T19:20:42+5:302023-04-25T19:22:57+5:30
गव्हाचे सीलबंद पॉकेट उघडले असता त्यातून दुर्गंधी येऊन सडलेला उंदीर आढळला.
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: अंगणवाडीमधून ९ महिन्याच्या बाळाच्या आईस देण्यात आलेल्या गव्हाच्या सिलबंद पॉकेटमध्ये चक्क सडलेला उंदीर निघाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता तालुक्यातील धोत्रा येथे उघडकीस आली.
धोत्रा येथील अंगणवाडीतून ९ महिन्याच्या विश्वजित प्रमोदसिंग जाधव या लहान बाळाचे पोषण आहार अंतर्गत मिळणारे धान्य अंगणवाडी सेविका भागाबाई गवळी यांनी मुलाची आई माधुरी जाधव यांना शुक्रवारी दिले होते. माधुरी जाधव यांनी ते पॉकेट घरात ठेवले. मंगळवारी दुपारी ते पॉकेट उघडले असता दुर्गंधी येऊन त्यात सडलेला उंदीर आढळून आला. त्यांनी याची माहिती अंगणवाडी सेविका मदतनीस , सरपंच यांना दिली.
त्यानंतर सरपंच पदमाबाई जाधव, नागरिक आनंदसिंग जाधव, विशाल जाधव, प्रमोद जाधव, पंकज जाधव, अंगणवाडी सेविका भागाबाई गवळी, मदतनीस सुलोचना जाधव, नंदकिशोर जाधव, मंडाबाई पालोदकर, मंगलाबाई दांडगे, उषा सपकाळ, हेमलता पाटील यांनी अंगणवाडीमध्ये जाऊन इतर आहाराची पाहणी केली. इतर आहारात काहीही निघाले नाही. उंदरी निघालेल्या पॉकेटचा पंचनामा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग आयुक्तालय एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत महाराष्ट्र स्टेट कंझुमर फेडरेशन मुंबईकडून आलेला या पॉकेटमध्ये मेलेला उंदीर निघाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
अहवाल आल्यानंतर कारवाई
पॉकेट जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल. अहवाल आल्यानंतर संबंधित कंपनी विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
- दीपक मेहेत्रे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास,सिल्लोड
आमचा दोष नाही
आठ दिवसांपूर्वी आलेला पोषण आहार शुक्रवार व शनिवारी वाटप केला. एका बंद पॉकेटमध्ये मेलेला उंदीर निघाला आहे. मात्र, यात आमचा दोष नाही.
- भागाबाई गवळी, अंगणवाडी सेविका, धोत्रा